मुंबई : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणातील रेल्वे प्रवासही भूरळ घालणारा आहे. मुंबई-गोवा रेल्वे प्रवासात नयनरम्य हिरवळ, धबधबे, नद्या आदी दृष्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची संधी देणारा विस्टाडोम डबा मुंबई – मडगाव जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. इतर सर्व डब्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट भाडे असलेला हा डबा गणेशोत्सव काळात पूर्णपणे आरक्षित झाला आहे. विस्टाडोम डब्यातील तिकिटासाठी प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. तर ६ सप्टेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्याच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपली आहे.

हेही वाचा >>> ‘ऑपरेशन मंडे होल्ड’अंतर्गत १२२ संशयीत कंटेनर थांबवले, प्रतिंबधीत चीनी फटाके व वस्तूंच्या संशय, न्हावाशेवा बंदरावर तपासणी सुरू

मध्य रेल्वे प्रशासनाने सर्वात प्रथम मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला काचेचे छत आणि रुंद खिडक्या असलेला विस्टाडोम डबा २०१८ साली जोडण्यात आला. या डब्याला वाढणारा प्रतिसाद पाहून मुंबई – मडगाव मार्गावरील तेजस एक्स्प्रेसला २०२२ मध्ये दुसरा विस्टाडोम डबा जोडण्यात आला. तेजस एक्स्प्रेसला विस्टाडोमचे दोन डबे आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात विस्टाडोम डब्यातून प्रवास करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.

हेही वाचा >>> गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग उच्च न्यायालयाकडून मोकळा, भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्याची मागणी फेटाळली

नोकरीनिमित्त कोकणातील मूळगावापासून बाहेर गेलेला कोकणी माणूस गणेशोत्सवानिमित्त कोकणाची वाट धरतो. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव आहे. त्यापूर्वीच अनेक कोकणवासीयांनी गावी जाण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मंगळवारपासून तिकीट काढण्यासाठी दगदग सुरू आहे. मात्र, कोकणात जाणाऱ्या बहुतांश सर्वच रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश दिसत आहेत. आता कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसचा विस्टाडोम डबाही प्रतीक्षा यादीत आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसच्या ४, ५, ६ सप्टेंबर रोजीच्या द्वितीय आसन श्रेणीची आणि ५,६ सप्टेंबरची वातानुकूलित आसन श्रेणीची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’ दाखवित आहे. तर, विस्टाडोम डब्याची ४ आणि ५ सप्टेंबरची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ३२, ४९ वर होती. तर, ६ सप्टेंबर रोजीचे तिकीट आरक्षण ९ मेपासून सुरू झाले. या विस्टाडोम डब्याची  प्रतीक्षा यादी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ नंतर ‘रिग्रेट’ दाखवित होती. तेजस एक्स्प्रेसच्या दोन विस्टाडोम डब्याचे आरक्षण सुरू झाले असून ५ सप्टेंबर रोजीची प्रतीक्षा यादी २३ झाली होती.