scorecardresearch

अखेर कांदळवन कक्षाला आली जाग ; जुहू, गिरगाव, वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’पासून खबरदारीचे फलक

मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जुलैपासून जेलिफिशसदृश विषारी ‘ब्ल्यू बॉटल’ आले असून ‘ब्लू बॉटल’मुळे पर्यटक धास्तावले आहेत.

अखेर कांदळवन कक्षाला आली जाग ; जुहू, गिरगाव, वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’पासून खबरदारीचे फलक
( जुहू समुद्रकिनाऱ्यावर 'ब्लू बॉटल'पासून सावध राहण्याबाबतचे फलक लावण्यात आले होते. मात्र, जोरदार वाऱ्यांमुळे फलक फाटले आहेत )

मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जुलैपासून जेलिफिशसदृश विषारी ‘ब्ल्यू बॉटल’ आले असून ‘ब्लू बॉटल’मुळे पर्यटक धास्तावले आहेत. अखेर महिन्याभरानंतर जाग आलेल्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानने जुहू, गिरगाव, वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’पासून खबरदारी बाळगावी, अशा आशयाचे फलक लावून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात जोरदार वारा आणि उसळणाऱ्या लाटांसोबत ‘ब्लू बॉटल’ मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर येतात. ‘ब्लू बॉटल’चा दंश झाल्यास नागरिकांना प्रचंड वेदना होतात. अंगावर लाल चट्टे येतात. काही वेळा दंश झालेला भाग सूजतो आणि प्रचंड वेदना होतात. बराच काळ किनाऱ्यावर राहिल्यानंतर ‘ब्लू बॉटल’चा मृत्यू होतो. असे असले तरी त्यांना स्पर्ष केल्यास प्रचंड वेदना होतात. गेल्या महिन्यांपासून जुहू, गिरगाव येथील समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला आलेली अनेक लहान मुले, तरुणांना ‘ब्लू बॉटल’चा दंश झाला आहे. प्रथमोपचारानंतर त्यांना बरे वाटले. मात्र, ‘ब्लू बॉटल’च्या दंशाचे प्रकार वाढत असताना प्रशासनाकडून मात्र कोणतीच खबरदारीची उपाययोजना करण्यात येत नव्हती. यासंदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. अखेर महिनाभरानंतर कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान, कोस्टल कन्झर्व्हेशन फाऊंडेशनने जुहू, गिरगाव, वर्सोवा येथे इंग्रजी आणि मराठी भाषेत इत्यंभूत माहिती असलेले फलक लावले. ‘ब्लू बॉटल’ काय आहे, त्यापासून कोणती खबरदारी घ्यावी, दंश झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात, आदी माहितीचा त्यात समावेश आहे.

जुहूला फलक लावले आणि फाटलेही
जुहू समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’पासून सावध राहण्याबाबतचे फलक बुधवारी लावण्यात आले होते. मात्र, जोरदार वाऱ्यांमुळे फलक फाटले आहेत. त्यामुळे पर्यटकांना नेमकी माहिती मिळू शकत नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.