अग्निशमन दलात वर्षां जल संचयनाचा विसर
मुंबईमध्ये २००९-१० मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होताच तहानलेल्या पालिकेने शहरात उभ्या राहत असलेल्या समस्त इमारतींमध्ये ‘वर्षां जल संचयन’ प्रकल्प सक्तीचा केला. मात्र आगीच्या दुर्घटना घडल्यानंतर पाण्याची मोठय़ा प्रमाणावर गरज भासणाऱ्या अग्निशमन दलाच्या केंद्रांमध्ये ‘वर्षां जल संचयन’ प्रकल्प राबविण्याचा पालिकेला मात्र विसर पडला आहे. त्यामुळेच आजतागायत कोटय़वधी लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय झाला. त्याबद्दल पालिका कोणाला शासन करणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे.
पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पालिकेने २००७ पासून मुंबईत ‘वर्षां जल संचयन’ योजनेचा श्रीगणेशा केला. मुंबईमध्ये २००९ मध्ये अपुरा पाऊस पडला आणि त्यामुळे २०१० मध्ये मुंबईत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. त्यावेळी पालिकेला ‘वर्षां जल संचयन’ योजनेची आठवण झाली आणि पालिकेने बांधण्यात येणाऱ्या सर्व नव्या इमारतींमध्ये ही योजना सक्तीची केली. त्याचबरोबर सोसायटय़ांनी ही योजना राबविल्यानंतर प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करामध्ये काही प्रमाणात सवलत देण्याची घोषणाही केली होती.
पालिकेने त्यावेळी आपल्या काही मालमत्तांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णयही घेतला. मात्र पालिकेला आपले एक अंग असलेल्या अग्निशमन दलाच्या केंद्राचा मात्र, विसर पडला. मुंबईमध्ये ३३ अग्निशमन केंद्रे आहे. त्यापैकी एकाही अग्निशमन केंद्रामध्ये ही योजना राबविण्यात आली नाही. मुंबईमध्ये झपाटय़ाने लोकसंख्या वाढत असल्याने अग्निशमन दलाच्या केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मानखुर्द येथे देवनार कचराभूमीजवळ एक नवे अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र अलीकडेच उभारलेल्या या अग्निशमन केंद्रामध्येही ‘वर्षां जल संचयन’ योजना राबविण्यात आलेली नाही.
मुंबईमध्ये एखाद्या इमारतीला आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान धाव घेतात. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना मोठय़ा प्रमाणावर पाणी लागते. अग्निशमन केंद्रांच्या आवारात ‘वर्षां जल संचयन’ योजना राबविण्यात आली असती, तर त्या पाण्याचा आग विझविण्यासाठी वापर करता आला असता. मात्र तसा विचार प्रशासन पातळीवर झालाच नाही. त्यामुळे आजही आग विझविण्यासाठी पिण्याच्याच पाण्याचा वापर होत आहे. परिणामी, गेल्या काही वर्षांमध्ये कोटय़वधी लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water harvesting project bmc fire brigade
First published on: 04-05-2016 at 02:23 IST