हिवाळी हंगामात मुंबई आणि ठाणे खाडी परिसरात दरवर्षी देश-परदेशातून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र प्रत्यक्षात गेल्या कि त्येक वर्षांपासून कधीही निरीक्षणात न आलेले पाहुणे देखील यंदाच्या वर्षी मुंबई आणि ठाणे खाडी परिसराला भेट देत आहेत. हिवाळ्यात युरोपातून भारतात स्थलांतर करणाऱ्या ‘वॉटर रेल’ या पक्ष्याला २३ वर्षांनंतर टिपण्यात डोंबिवलीतील पक्षी निरीक्षकांना यश आले आहे. कोपर या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस या पक्ष्यास टिपण्यात आले असून त्यानंतर मात्र, हा पक्षी दिसेनासा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यात युरोप आणि उत्तर आफ्रिकेच्या भागातून उत्तर भारतात स्थलांतर करणारा ‘वॉटर रेल’ हा पक्षी कोपर गणेशघाट परिसरात आढळून आला. या पक्ष्याला मराठीत ‘पाण फटाकडी’ असे म्हहटले जाते. तपकिरी रंगाच्या या पक्ष्याची चोच लांब असून त्याच्या पंखांवर काळ्या रंगाचे ठिपके असतात. पंखाखालील पूर्ण शरीर हे निळसर-राखाडी रंगाचे असते, तर शरीराला निमुळता लहान शेपटीसारखा भागही असतो. उन्हाळ्यात प्रजननाच्या निमित्ताने आणि हिवाळा अशा दोन्ही हंगामात हे पक्षी स्थलांतर करतात.

मुंबई परिसरात या पक्ष्याला २३ वर्षांनंतर पाहण्यात आले असून यापूर्वी २५ डिसेंबर १९९४ साली हिरा पंजाबी या पक्षी निरीक्षकाला ठाणे खाडी परिसरात हा पक्षी आढळला होता. यंदा २ डिसेंबर रोजी डोंबिवलीचे पक्षीनिरीक्षक मनीष केरकर यांना हा पक्षी आढळताच त्यांनी तो आपल्या कॅमेऱ्यात टिपला. ठाणे खाडी परिसराप्रमाणेच डोंबिवली परिसरातील भोपार हिरतक्षेत्र, मोठी देसाई, कोपर गणेशघाट आणि सातपूल हे परिसर पक्षीनिरक्षणाकरिता समृद्ध असल्याची माहिती केरकर यांनी दिली. या भागातून आजवर सुमारे २९४ प्रजातींच्या पक्ष्यांना कॅमेऱ्यात टिपल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ‘वॉटर रेल’ या पक्ष्याला टिपल्यानंतर पुढील दोन दिवस त्याचे वास्तव्य या परिसरात होते. मात्र त्यानंतर हा पक्षी निरीक्षणात न आल्याचेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water rail bird after 23 years in thane area
First published on: 19-12-2017 at 02:17 IST