प्रजा फाऊंडेशनचा अहवाल; झोपडपट्टीतील रहिवाशांचा पेयजलावर मासिक ५०० रुपये खर्च

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पिण्याच्या पाण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना दरमहा पाचशे रुपये अधिकचे खर्च करावे लागतात, असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशनच्या या वर्षीच्या नागरी सेवांबाबत जाहीर केलेल्या अहवालात काढण्यात आला आहे. मुंबईत इमारतींत राहणाऱ्यांना ठरावीक  मानकांपेक्षा जास्त म्हणजे सरासरी दरडोई दीडशे लीटर पाणी दिले जाते, तर झोपडपट्टीत मात्र मानकांपेक्षा कमी जेमतेम ४५ लीटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जर झोपडपट्ट्यांना जलमापके  लावून पाणीपुरवठा केला तर त्यांचा हा अतिरिक्त खर्च कमी होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

प्रजा फाऊंडेशन या संस्थेने नागरी सेवांबाबतच्या २०२०-२१ या वर्षीचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. यात मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणी, स्वच्छता, शौचालयांची स्थिती या पालिकेतर्फे  पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी १३५ लिटर या प्रमाणात पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र मुंबईत इमारतीत राहणाऱ्यांना दर दिवशी दरडोई १५० लिटर पाणी दिले जाते तर झोपडपट्टीत हेच प्रमाण ४५ लीटर आहे. या असमान वाटपामुळे झोपडपट्टीतील लोकांना दरमहा टँकरसाठी किंवा अनधिकृतपणे पाणी मिळवण्यासाठी पाचशे रुपये खर्च करावे लागत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे झोपडपट्टीत मीटरयुक्त जलजोडण्या दिल्यास त्यांना माफक दरात पाणी मिळू शकेल, असेही सुचवण्यात आले आहे.

कचरा उचलण्यात कुचराई

पालिकेने करोनाकाळात चांगली कामगिरी केली असली तरी या काळात विविध नागरी सेवांवर परिणाम झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे प्रमाण १०० टक्के झाले असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत असले तरी करोनाकाळात कचरा उचलण्याचे प्रमाण घटले आहे. एकूण तक्रारींपैकी ३४ टक्के तक्रारी या कचरा उचलला जात नाही याकरिता केलेल्या होत्या, असेही या अहवालात म्हटले आहे. कचरा उचलला जात नाही अशा  ३९४३ तक्रारी २०२० मध्ये दाखल झाल्या आहेत. आलेली तक्रार सोडवण्यासाठी लागणारा कालावधीही करोनाकाळात वाढला असल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. पाण्याविषयीच्या तक्रारी सोडवण्यासाठी सरासरी २९ दिवस लागले तर घनकचरासंबंधी तक्रारी सोडवण्यासाठी ४३ दिवस लागल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

पालिके चे कौतुक

विविध अहवालांच्या माध्यमातून पालिकेवर नेहमी टीका करणाऱ्या प्रजा फाऊंडेशनने करोनाकाळात पालिकेने दिलेल्या आरोग्य सेवेबाबत कौतुक केले आहे. पालिकेने २४ वॉर्डमध्ये नियंत्रण कक्ष उभारले, विकेंद्रित नियंत्रण कक्षामुळे रुग्णांचे नियोजन करणे सोपे गेले असेही संस्थेने म्हटले आहे. तसेच दरदिवशी पालिकेतर्फे  डॅशबोर्डवर अद्ययावत केली जाणारी माहितीदेखील कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply occupants building three times slums area akp
First published on: 09-06-2021 at 00:23 IST