डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणांनी हल्लेखोरांबाबत अद्याप काहीही जाहीर केलेले नसताना तथाकथित पुरोगामी आणि काही राजकीय पक्षांनी सनातन भारतीय संस्कृती संस्थेला या हत्येप्रकरणी जबाबदार ठरविण्याचे सुरू केलेले उद्योग आम्ही सहन करणार नाही, असा इशारा ‘सनातन’चे प्रवक्ते अभय वर्तक यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिला. डॉ. दाभोलकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने धर्मादाय आयुक्तांकडे १० वर्षांचे हिशेब सादर केलेले नाहीत, असे सांगत त्यांच्या संस्थेला परदेशातून मिळणाऱ्या पैशांची चौकशी करा, अशी मागणी वर्तक यांनी या वेळी केली. लाखो वारकरी तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना आणि निवृत्त न्यायाधीशांनी अंधश्रद्धाविरोधी विधेयकासंदर्भात उपस्थित केलेले आक्षेप धाब्यावर बसवून सरकारने वटहुकूम काढला, तर त्याविरोधात राज्यपालांकडे दाद मागण्यात येईल, असेही अभय वर्तक यांनी सांगितले.
डॉ. दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. त्यांची हत्या धक्कादायक असून त्याचा आम्ही निषेध करतो. दाभोलकर यांना आमचा विरोध वैचारिक पातळीवर असूनही या हत्येबाबत सनातन संस्थेला फासावर लटकविण्याचे तथाकथित पुरोगामी लोकांचे उद्योग सहन केले जाणार नाहीत, असे ते म्हणाले. हिंदू धर्मावरील टीका त्यांनी थांबवावी यासाठी त्यांच्या विरोधात अनेक प्रकरणांत सनातनने न्यायालयात दावे दाखल केले असून त्यांचा प्रतिवाद करणारी पुस्तकेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. जी मंडळी सनातनला या हत्याप्रकरणी गुंतविण्याचा उद्योग करत आहेत त्यांच्या विरोधातही आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले. जादूटोणाविरोधी विधेयकात अनेक त्रुटी असून सरकारने वटहुकूम काढला, तर त्याविरोधातही कायदेशीर लढाई लढली जाईल, असेही ते म्हणाले.
या विधेयकात हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालणारी अनेक कलमे असून लाखो वारकरी, हिंदुत्ववादी संघटना तसेच वारकरी संप्रदायाला डावलून वटहुकूम काढणे सरकारला परवडणारे आहे का, याचाही विचार सरकारने करावा, असा इशारा वर्तक यांनी दिला.