राज्यात आणि मुंबई पालिकेत आमची सत्ता आहे. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मुंबईत स्मारक उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील किती मोठं व्यक्तिमत्त्व होते, हे त्यांच्या चरित्राचे पुस्तक किती जाड आहे, यावरून समजणार नाही. ते इंग्रजांशी लढले, रझाकारांशी लढले. या सगळ्या लढाईमध्ये मरणसुद्धा विसरलेली ही माणसं होती. देवदूतच होते की काय कळत नाही. गरिबांसाठी त्यांनी गोऱय़ा साहेबाला झटका देण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठीच मुंबईत त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.