राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. पुढील काळात राज्याचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणीटंचाई मुक्त करणे, राज्याचा संतुलित औद्योगिक विकास करणे, सुनियोजित नागरीकरण करणे आणि शिक्षणाचा दर्जा वाढविणे या पंचसूत्रीवर भर दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली.
मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन केल्यावर राज्यातील जनतेला संबोधित करताना चव्हाण यांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मे आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण आपण कृतज्ञतापूर्वक करुया व कष्टाने मिळविलेले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची शपथ घेऊया, असे आवाहन केले.
ते म्हणाले, यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनावर दु:खाचे सावट पडले आहे ते कालच मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये घडलेल्या दुर्घटनेचे. देशाचे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्यासमवेत मी कालच या अपघातस्थळी भेट दिली. या दुर्घटनेबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आवश्यकता लागल्यास नौदलाच्या मदतीकरीता आम्ही राज्याची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
कायद्याने आणि नियमांनी आखून दिलेल्या चाकोरीतून देशाचा किंवा एखाद्या राज्याचा गाडा चालतो. मात्र याहीपेक्षा सर्वात महत्वाची ऊर्जा असते ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना. आपण सर्व एकसंघ आहोत, राज्य आणि प्रदेश वेगवेगळे असले तरी देशाच्या प्रती आपले कर्तव्य आहे ही भावना महत्वाची आहे, असे चव्हाण म्हणाले.