आठवड्याची मुलाखत : करोना नियंत्रणात, तरीही खबरदारी गरजेची!

मुंबईसह राज्यात एप्रिल, मेमध्ये उसळी घेतलेल्या करोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरायला जवळपास पाच महिन्यांचा कालावधी लागला.

डॉ. प्रदीप आवटे,राज्याचे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख

मुंबईसह राज्यात एप्रिल, मेमध्ये उसळी घेतलेल्या करोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरायला जवळपास पाच महिन्यांचा कालावधी लागला. सध्या राज्यात दैनंदिन सरासरी सुमारे दीड हजार रुग्ण नव्याने आढळत असून मे २०२० पासून प्रथमच रुग्णसंख्येचा आलेख इतका खाली उतरला आहे. मात्र अजूनही करोनाचा संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे हा आजार पूर्णपणे कधी संपणार की आणखी काही काळ आपल्यासोबत राहणार, अंतर्जन्य स्थिती म्हणजे काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी राज्याचे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी साधलेला संवाद…

’ सध्या राज्यात करोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे का?

सध्या दुसऱ्या लाटेच्या अगदी टोकाकडे आलो आहोत. दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास दोन टक्क्यांपेक्षा कमी झालेली आहे. प्रतिदिन जवळपास दीड लाख चाचण्या केल्या जात असून यात १५०० ते १८०० रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. ही गेल्या वर्षी मेनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या असून संसर्गाचा प्रसार मागच्या काही दिवसांपासून नक्कीच कमी झाला आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाधितांचे प्रमाण हे पाच टक्क्यांहून कमी असणे म्हणजे साथ नियंत्रणाखाली आहे असे म्हणतात. काही मोजकेच जिल्हे वगळता सर्व राज्यांत आता साथ पूर्णपणे नियंत्रणाखाली आली आहे असे म्हणता येईल.

’ साथ नियंत्रणात आली तरी अजूनही रुग्ण का आढळत आहेत?

करोना हा साथीचा आजार लगेचच पूर्णत: नष्ट होणार नाही. स्वाइन फ्लू, डेंग्यू याप्रमाणे याचेही काही काळाने छोट्या प्रमाणात उद्रेक होतच राहणार आहेत, यालाच अंतर्जन्य स्थिती म्हणजेच एन्डेमिक असे म्हणतात. सध्या दुसरी लाट ओसरत असून आपण ‘एन्डेमिक’ स्थितीकडे जात आहोत.

’ एन्डेमिक म्हणजे काय?

एखादा आजार मोठ्या प्रमाणात सर्व जगभरात पसरतो त्याला ‘पॅन्डेमिक’ म्हणजेच महासाथ असे म्हटले जाते. परंतु एखाद्या आजाराचे तुरळक रुग्ण नियमितपणे आढळत राहणे. आजाराच्या प्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यावर पुन्हा पुन्हा छोट्या स्वरूपात डोके वर काढत राहतो. समाजातून पूर्णत: नाहीसा झालेला नसतो. याला आजाराची ‘एन्डेमिक’ स्थिती म्हणतात. उदारहणार्थ, स्वाइन फ्लूचा आता मोठा उद्रेक होताना दिसत नाही. नाही. परंतु दर महिन्याला काही रुग्ण आढळतात. त्याप्रमाणेच पुढील काळ करोनाही ‘एन्डेमिक’ स्थितीमध्ये आपल्या सोबत असणार आहे.

’ आपल्याकडे तिसरी लाट येणार का?

जगभरात अनेक देशांमध्ये तिसरी लाट आली आणि ती अधिक तीव्रदेखील होती. परंतु जगभरात तिसरी लाट येण्याचे प्रमुख कारण हे करोनाचे उत्परिवर्तित रूप डेल्टा हे होते. डेल्टा हा वेगाने पसरणारा विषाणूचा प्रकार असल्यामुळे इतर देशात तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. भारतात किंवा महाराष्ट्रात अधिक तीव्रतेने आलेल्या दुसऱ्या लाटेचे प्रमुख कारण डेल्टा हेच होते. त्यामुळे सध्या राज्यात डेल्टाने बाधित झालेल्यांचे प्रमाणही जास्त आहे. आपण सातत्याने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने पाठवून लक्ष ठेवून आहोत. परंतु गेल्या चार महिन्यांत विषाणूच्या रूपात फारसा बदल झालेला आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहिली तर डेल्टाविरोधात प्रतिकारशक्ती तयार झालेल्या समाजात पुन्हा डेल्टामुळेच लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु छोट्या छोट्या प्रमाणात राज्यात विविध भागांमध्ये रुग्णसंख्या वाढेल.

’ करोनाच्या विषाणूचा प्रभाव तुलनेने कमी झाला आहे का?

करोना विषाणूचा प्रभाव समाजात तुलनेने नक्कीच कमी झाला आहे. त्याचमुळे प्रसारही कमी प्रमाणात होत आहे. सध्या सिझनल फ्र्लू किंवा वातावरणीय बदलामुळे होणारे अन्य विषाणूजन्य ताप आणि श्वसनाच्या आजारांचे प्रमाण अधिक आहे. सध्या आढळणाऱ्या सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये करोनाऐवजी याचेच प्रमाण जास्त आढळते. महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेला आजार इतर विषाणूजन्य आजारांना डोके वर काढू देत नाही. गेल्या दोन, तीन महिन्यांत वातावरणीय बदलांच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे, याचाच अर्थ करोना विषाणू काही प्रमाणात कमकुवत झालेला आहे, असा निष्कर्ष काढता येईल.

’ करोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याची गरज आहे का?

करोनाची लाट नियंत्रणात आली असून आपण अंतर्जन्य स्थितीकडे जात आहोत, तिसऱ्या लाटेची शक्यता फार कमी आहे हे सर्व खरे असले तरी हे निष्कर्ष सध्याच्या परिस्थितीवरून काढलेले आहेत. जर डेल्टाप्रमाणे करोनाचे तीव वेगाने प्रसार करणारे उत्परिवर्तित झाल्यास अशी परिस्थिती राहणार नाही. दुसरे म्हणजे जरी विषाणूचा प्रसार आटोक्यात आला असला तरी अंतर्जन्य स्थितीतही एखाद्या विभागात, प्रदेशात छोट्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर आणि हातांची स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यकच आहे.

’ या नियमांपासून सुटका कधी मिळणार?

संसर्गामुळे आलेली आणि लसीकरणामुळे आलेली प्रतिकारशक्ती यामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती वाढत जाईल. साधारण मार्चनंतर करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची फारशी गरज भासणार नाही. सध्याच्या करोना विषाणूच्या स्थितीमध्ये फारसा बदल झाला नाही, तर निश्चितच विषाणूचा प्रादुर्भाव येत्या एप्रिलपर्यंत बऱ्यापैकी कमी झालेला असेल असे सध्याच्या स्थितीत वाटते.

’ सणांमध्ये गर्दी वाढल्यावर पुन्हा रुग्णसंख्या वाढेल?

समाजात विषाणू अंतर्जन्य स्थितीकडे जात असला तरी त्याचा स्रोत कुठे ना कुठे जिवंत असतो. सध्या तर अजूनही आपल्याकडे सुमारे दीड हजार रुग्ण प्रतिदिन आढळत आहेत. ज्या नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते किंवा ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती अन्य आजारांमुळे कमी होते, अशा जणांमध्ये हा आजार टिकून राहतो. त्यामुळे अशा नागरिकांचा किंवा रुग्णांचा समूहामध्ये या आजार नक्कीच डोके वर काढणार. त्यामुळे येत्या काळात सणांमध्ये झालेली गर्दी, पूर्ववत व्यवहार सुरू झाल्यानंतर काही भागांमध्ये छोटे उद्रेक होणे, रुग्णसंख्येत ५ ते १० टक्के वाढ होणे हे आढळणार. परंतु म्हणूनच करोना प्रतिबंधाच्या नियमांचे पालन पुढील काही काळ करणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे.

– मुलाखत : शैलजा तिवले

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Weekly interview corona under control but caution is needed akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या