बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगारासाठी महिन्याच्या २० तारखेपर्यंत वाट पाहण्याची वेळ आल्यानंतर आता जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचीही ‘पगारमार’ होत असल्याचे समोर आले आहे. आधी दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला मिळणारे पगार हळूहळू सातव्या दिवशी, १५व्या दिवशी असे लांबत गेले आणि या महिन्यात पगार अद्याप मिळालेला नसल्याने आता जेट एअरवेजचे कर्मचारी २८ मे रोजी थेट कंपनीच्या मुख्य परिचालन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
डिसेंबर २०१३मध्ये जेट एअरवेजला २६८ कोटी रुपयांच्या तोटय़ात होती. मात्र इतेहाद कंपनीने २०६० कोटी रुपये देत या कंपनीला हात दिला. असे असले, तरी कर्मचाऱ्यांचा पगार अद्यापही झालेला नाही.
पूर्वी जेटमध्ये महिन्याच्या शेवटच्या तारखेला पगार देण्याची परंपरा होती. मात्र त्यानंतर ही तारीख बदलून महिन्याच्या ७ तारखेला पगार वाटला जाऊ लागला. कंपनीला आर्थिक फटका बसू लागल्यावर ही तारीख १५ करण्यात आली. आता इतेहाद कंपनीकडून मोठी मदत मिळूनही ही तारीख कायम ठेवण्यात आली आहे. या महिन्यात तर अद्यापही आम्हाला पगाराचे पैसे मिळालेले नाहीत, असे जेट एअरवेजमधील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कंपनीला आर्थिक फटका बसला, त्या वेळी आम्ही कोणतीही कुरबूर न करता १५ तारखेला हातात मिळणारा पगार स्वीकारला. मात्र आता कंपनीला मदत मिळूनही आम्हाला पगार मिळालेला नाही. ज्या दिवशी कंपनीला पगार देणे शक्य होणार नाही, त्या दिवशी आम्ही सर्वच कंपनी सोडून जाणार आहोत. किंगफिशरमधील आमच्या सहकार्याबरोबर जे घडले, ते आमच्या बाबतीत घडू नये, अशी आमची इच्छा आहे, असेही या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.