मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा लाभ ऐच्छिक असेल, असेही सरकारने स्पष्ट केले. राज्य सरकारने घेतलेल्या अशाप्रकारच्या निर्णयावर आता भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया आहेत. “आरक्षणाच्या निर्णयाचं काय होईल, याबाबत सरकारला विश्वास दिसत नाही. तसेच यातून सरकारची हतबलता दिसून येते, त्यामुळेचं EWS संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.” असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयावर दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझंही स्वतःचं मत आहे की यामध्ये धोक्याची शक्यता वाटते. यामध्ये वेगळं काय केलं? आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे (ईडब्ल्यूएस) आर्थिक आरक्षण सर्वांसाठी होतंच. परंतु, मी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना विचारलं की, शासनाकडून ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा निर्णय घेतला जात असताना, न्यायालयात आपण विचारणा केली का? की या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणानंतर मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाचे (एसईबीसी) काय होणार? एकतर न्यायालयात या संदर्भात भूमिका स्पष्ट करायला सरकार म्हणून हवी होती की, त्या विषयावर आमची तडजोड राहणार नाही. त्या विषयावर आम्ही ठाम आहोत, याचं काय करणार?. न्यायलयाकडून या विषयाबाबत स्पष्टता येणं आवश्यक आहे.”

मराठा समाजाला ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ

तसेच, “आता आम्हाला सरकारच्या भूमिकेवरच संशय येतो आहे. आता ते हतबल झाल्याचे दिसत आहे, आरक्षणाचा निर्णय काय होईल? याबाबत त्यांना आत्मविश्वास नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत ईडब्ल्यूएस तरी देऊन , मराठा समजाचा असलेला आक्रोश व उद्रेकाला आपल्याला अटकाव करता येतो आहे का? अशा प्रकारचा दुर्देवी व केविलवाणा प्रयत्न दिसतो आहे.” असं देखील दरेकर म्हणाले.

“मला वाटतं ईडब्ल्यूएस मिळालं पाहिजे तात्पुरतं यात काही दुमत नाही. परंतु ते करत असतान जे मराठा समजाचं भविष्य आहे. ते आरक्षण जाता कामा नये, यासाठी सरकारने मराठा समाजाला आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे.” असं देखील दरेकर यांनी यावेळी बोलून दाखवलं.