पोलीस महासंचालक संजीव दयाळ दबाव टाकत असल्यामुळेच आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रंजिक कुमार सहाय (५२) यांच्या मलबार हिल येथील राहत्या घरात मिळाली आहे. उच्चस्तरिय सूत्रांनी ही माहिती दिली. रंजिक कुमार सहाय यांनी स्वतः ही चिठ्ठी लिहिल्याची माहितीही मिळाली आहे. दरम्यान, सहाय यांच्या घरातून कोणतीही चिठ्ठी मिळाली नसल्याचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महासंचालक देवेन भारती यांनी सांगितले. सहाय यांनी रविवारी राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली होती. सहाय यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू असून ते ६० टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा आत्महत्येचा प्रयत्न
१९८६ च्या बॅचचे आयपीएएस असलेले सहाय हे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळात दोनच महिन्यांपूर्वी अतिरिक्त महासंचालक पदावर बढती मिळून आले होते. सहाय हे कुटुंबियांसह मलबार हिल येथील ‘अंबर अवंती’ या सरकारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. रात्री एकच्या सुमारास त्यांनी जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या वेळी पत्नी आणि दोन मुले घरात उपस्थित होते. सहाय यांना त्वरीत उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.