मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी या निर्णयावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. फक्त भगवदगीताच का ? कुराण, बायबल आणि अन्य धर्मांच्या पुस्तकांचेही वाटप करा. ज्याला जे वाचायचे आहे ते वाचूं द्या असे आझमी म्हणाले.

मला कोणी भगवदगीता दिली तर मी नक्की घेईन पण भगवदगीतेचे वाटप करुन धर्माच्या नावावर दिशाभूल केली जात आहे. भाजपाकडून ही २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. मी या निर्णयाचा निषेध करतो. महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटण्याचे परिपत्रक काढणाऱ्या सहाय्यक संचालकाला तात्काळ निलंबित करा व विनोद तावडेंनी सभागृहात येऊन माफी मागितली पाहिजे अशी मागणी आझमी यांनी केली.

दरम्यान या निर्णयावर टीका होऊ लागल्यानंतर विनोद तावडेंनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं असं आव्हानच त्यांनी विरोधकांना दिलं आहे. तसंच श्रीकृष्ण खोटं बोलत होते असं मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट करावं असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याची सूचना देण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवतगीता वाटली जाणार आहे. परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवतगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवतगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.