भुजबळांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल; ५० हजार कोटींच्या रस्त्यांवर टोलमाफीची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ या आजी-माजी बांधकाममंत्र्यांमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याची स्पर्धाच लागली आहे. पाटील यांनी भुजबळांना आव्हान देताच भुजबळांनीही त्यांच्या शैलीत पाटील यांना प्रतिआव्हान देताना मुंबईचा टोल का रद्द केला जात नाही, असा सवाल केला आहे. तसेच पाटील यांच्याबरोबर राज्यात कोठेही दौरा करण्याची तयारी दर्शविली आहे.
युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्यात एक हजार रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली, पण ही कामे जुनीच असल्याचा आक्षेप भुजबळ यांनी घेतला होता. तसेच राज्यात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचा आरोप केला होता. भुजबळ यांच्या पत्राला उत्तर देनाता पाटील यांनी, आघाडी सरकारमुळेच रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे खापर फोडताना ही अवस्था का झाली याची पाहणी करण्याकरिता संयुक्त दौरा करण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारल्याचे भुजबळ यांनी पाटील यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. मुंबई आणि कोल्हापूरमध्ये बसून चालणार नाही तर त्यासाठ फिरावे लागते, असा टोला पाटील यांना उद्देशून हाणला आहे.
मुंबईतील टोल रद्द करण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही भुजबळ यांनी केला आहे. टोल नाके बंद केल्याने राज्याच्या तिजोरीवर ८०० कोटींचा बोजा पडला. त्याचप्रमाणे या रस्त्यांची दुरुस्तीही आता शासनाला करावी लागत आहे. परिणामी ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता सरकारकडे निधीच उपलब्ध नाही, असा आरोपही भुजबळ यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भारतीस प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता खात्यातील अभियंत्यांकतडून माहिती घेतल्यास योग्य माहिती मिळेल, असे सांगत भुजबळांनी बांधकाम सचिव आनंद कुलकर्णी यांनाही अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यात ५० हजार कोटींचे रस्ते तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे वाचनात आले. हे रस्ते खासगीकरणातून करण्यात येणार आहेत. युती सरकारच्या टोलमुक्तीच्या धोरणानुसार या रस्त्यांवर टोल आकारला जाऊ नये, असी अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

More Stories onभुजबळ
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why mumbai toll can not cancel
First published on: 05-12-2015 at 02:41 IST