शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या ८२ वर्षांच्या, अंथरूणाला खिळलेल्या आणि चष्म्याशिवाय दिसूही न शकणाऱ्या कवी-लेखक वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव कठोर अटींवर अंतरिम जामीन मंजूर केल्यास भीती कसली? अटकेत असलेल्या ८२ वर्षांच्या व्यक्तीच्या जगण्याचा दर्जा काय असू शकतो? तुमच्या भीतीमुळे जामीन नाकारल्याने राव यांनी पुन्हा नानावटी रुग्णालयात नेण्याची वाट पाहायची का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने  गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यावर राव हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रकरणातील आरोपी आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याच्या मागणीसाठी राव यांनी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घ्यावे, अशी मागणी एनआयएने केली. वरवरा राव हे काही एकटेच वृद्ध आरोपी नाहीत. विविध आजारांनी ग्रस्त अनेक कच्चे कैदी आणि आरोपी कारागृहात आहेत. त्यांची कारागृह प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाते. शिवाय राव यांना कठोर अटींवर अंतरिम जामीन मंजूर करण्याऐवजी न्यायालयाने राज्य सरकारवर त्यांची योग्य ती काळजी घेण्याची अट घालण्याचे एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सूचित केले. सर्वोच्च न्यायालयाने ८५ वर्षांच्या आसाराम बापूंनाही गंभीर आरोपांमुळे जामीन देण्यास नकार दिल्याचे सिंह यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

राव यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना कारागृहात पाठवण्याऐवजी तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी राव आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्वतंत्र याचिकेद्वारे केली आहे. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमुर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why was varvara rao afraid to be released on bail abn
First published on: 29-01-2021 at 00:43 IST