‘माझा महाराष्ट्र, माझे व्हिजन’मध्ये मुख्यमंत्र्यांची ग्वाही
एक वर्षांचा काळ मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा नाही; मात्र आगामी वर्षांत महाराष्ट्राची दशा आणि दिशा नक्कीच बदलू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीतर्फे आयोजित ‘माझा महाराष्ट्र, माझे व्हिजन’ या कार्यक्रमाच्या आयोजनात व्यक्त केला. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमासाठी मुद्रित प्रायोजक आहे.
महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या एक वर्षांतील कामगिरीचा आढावा आणि चर्चा या कार्यक्रमात करण्यात आली. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. ‘सरकारसमोर दुष्काळाचे भीषण सावट आहे; परंतु भविष्यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला संरक्षित सिंचनाकडे नेऊ,’ असे सांगतानाच राज्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ज्यांनी चुना लावला त्यांना अजिबात सोडणार नाही, असेही ते म्हणाले. ३१ ऑक्टोबपर्यंत मराठवाडय़ाला त्याच्या हक्काचे पाणी मिळेल, असा दावाही केला.
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योग उभारताना पर्यावरणाशी तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. ‘महाराष्ट्रात उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या ७६वरून ३७वर आणण्यात आल्या. वीज जोडणीची मुदतही २१ दिवसांवर आणली आहे. कोकणातील स्थानिकांचा विचार करूनच कोकणात उद्योग आणू,’ ;तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकरिता बंद पडलेले उद्योग सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
महसूल आणि कृषिमंत्रिपद भूषविणाऱ्या एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची जंत्री सादर केली. जमिनीचे वाद मिटविण्यासाठी सर्व जिल्ह्य़ांची उपग्रहाद्वारे मोजणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या महिला-बालकल्याण आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘स्मार्ट सिटीप्रमाणे – स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना आपल्या विभागाच्या माध्यमातून राबविणार असल्याचे या वेळी बोलताना सांगितले.

अर्थ विभाग हा न दिसणारा विभाग आहे; परंतु पैशाचा योग्य विनियोग करून पायाभूत सुविधा पुरविण्यावर आपला भर राहील; परंतु महसूलवाढीसाठी काहीही करणे हे अर्थमंत्री म्हणून मला योग्य वाटत नाही,
-सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

मी २५ टक्के शिक्षकमंत्री व ७५ टक्के शिक्षणमंत्री समजतो. तसेच, शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामे नकोच; परंतु शाळाबाह्य़ विद्यार्थी शोधणे हे शिक्षणाव्यतिरिक्त काम आहे, असे वाटत नाही,’
-विनोद तावडे, शिक्षणमंत्री

’या कार्यक्रमाचे पुनप्र्रक्षेपण २६ ते ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ६ ते ७ आणि २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरला सकाळी १० ते ११ करण्यात येणार आहे.