मेट्रो प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडाडले असून ‘मराठी माणसाच्या मुळावर आल्यास हा प्रकल्प उखडून टाकू,’ असा खणखणीत इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
टोलमुक्त महाराष्ट्र ही सर्वाचीच भावना आहे, असे सांगत त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्या मताशी सहमती दर्शविली.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पामुळे मराठी माणूस हद्दपार होऊ नये, असे सांगून मराठी माणूस लढायला घाबरत नाही, असे ठाकरे यांनी शिवराय संचलन कार्यक्रमादरम्यान बोलताना स्पष्ट केले. मेट्रो प्रकल्प होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस देत असताना ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्याने या प्रकल्पात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.  माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे होत असलेली तासगावमधील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. पण हे आवाहन एकतर्फीच का, असा सवाल करीत बिनविरोध निवडणूक करायची असेल, तर शिवसेनेचे प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे होत असलेली वांद्रे (पूर्व) येथील पोटनिवडणूकही बिनविरोध करण्यात यावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

सरकार आपलेच आहे, पण त्यांनी संघर्षांची वेळ आणू नये.
-उद्धव ठाकरे