गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना मुंबई महापालिकेने खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोल्ड मिक्स तंत्रज्ञान अपयशी ठरल्यामुळे रस्ते विभागाने आता रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धत आणली असून त्याने रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत.

गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवण्याचे काम केले जाते. यंदाही तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. त्यानुसार पालिकेची यंत्रणा आता कामाला लागली आहे. अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी शनिवारी सकाळपासून क्षेत्रीय पाहणी करून या खड्डे भरणीचा आढावा घेतला. तसेच गणेशोत्सव कालावधीत रस्ते परिरक्षणाच्या दृष्टीने सर्व संबंधित रस्ते अभियंत्यांना आणि कंत्राटदारांना देखील त्यांनी आदेश दिले. या विशेष मोहीमेत, रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने विविध रस्त्यावरील खड्डे भरण्यात येत आहेत. दहिसर, मालाड, गोरेगाव, अंधेरी, वांद्रे परिसरात त्यांनी रस्ते विभागाच्या अधिकाऱयांसह पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) एम. एम. पटेल उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत डांबर व खडी यांचे शीत मिश्रण म्हणजेच कोल्ड मिक्स वापरले जात होते. मात्र हे मिश्रण टिकत नसल्यामुळे पालिकेने प्रयोग करून नवे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. त्यानुसार यंदा रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर करून खड्डे भरण्यात येत आहेत. त्यामुळे खड्डा भरल्यानंतर सहा तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे. बहुतांश ठिकाणी रात्री खड्डे भरण्याची कामे हाती घेतली जात आहेत.

मुंबई शहर विभागात ६९६ चौरस मीटर, पूर्व उपनगरांमध्ये ५६० चौरस मीटर आणि पश्चिम उपनगरांमध्ये ९५७ चौरस मीटर असे आतापर्यंत एकूण २,२१३ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे खड्डे रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरण्यात आले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या भागातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवले जातील, यासाठी स्वतः क्षेत्रीय पाहणी दौरे करावेत, सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांनी देखील गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकांशी संबंधित प्रमुख रस्त्यांची पाहणी करावी, असे आदेशही दिले आहेत.