भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील आरोपीने आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ए. जी. पेरारीवलनने ही याचिका दाखल केली आहे. या आरोपीने जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेत संजय दत्तची शिक्षा कमी करण्याचे निकष काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. संजय दत्त प्रमाणेच पेरारीवलन यालाही आर्म्स अॅक्ट अंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संजय दत्तची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावल्यानंतर त्याला उर्वरित शिक्षा तुरुंगात जाऊन भोगावी लागली. त्यातही महाराष्ट्र सरकारने संजय दत्तची सुटका मुदतीच्या आधी केली. त्याचा आधार नेमका काय होता? कोणते निकष त्यावेळी लावण्यात आले होते? असे प्रश्न आता पेरारीवलन याने उपस्थित केले आहेत.

राजीव गांधी यांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांनी मानवी बॉम्बचा वापर केला होता. या बॉम्बमध्ये दोन नऊ व्होल्टच्या बॅटरी जोडण्यात आल्या होत्या. या बॅटरी पेरारीवलन याने पुरवल्याचा आरोप ठेवून त्याला वयाच्या १९ व्या वर्षीच जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. मात्र या बॅटरी कशासाठी पुरवण्यात येणार होत्या त्याची माहिती मला नव्हती असं पेरारीवलनने म्हटलं आहे. संजय दत्तनेही त्याच्या बचावात असाच पवित्रा घेतला होता. अवैध शस्त्रं ही केवळ कुटुंबीयांच्या रक्षणासाठी सोबत ठेवली होती. ती कुठून आली, कशासाठी आणली याची आपल्याला माहिती नव्हती असं संजय दत्तने सांगितलं होतं. त्याच्या सुटकेसाठी कोणते निकष लावण्यात आले असा प्रश्न या याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत विचारला आहे.