सात लस कंपन्यांच्या कागदपत्रांची पालिकेला प्रतीक्षा
मुंबई : मुंबई महापालिकेने जागतिक पातळीवरील लस पुरवठादार कंपन्यांकडून स्वारस्यपत्रे मागवल्यानंतर आठ पुरवठादार पुढे आले होते. परंतु त्यापैकी फायझर लशीच्या पुरवठादाराने माघार घेतली आहे. तर उर्वरित सात कंपन्यांनीही अद्याप कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. पालिकेने कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी पुरवठादार कंपन्यांना १ जूनपर्यंत मुदत दिली आहे.
करोना प्रतिबंधात्मक लशींच्या एक कोटी मात्रांसाठी मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावरील पुरवठादारांकडून स्वारस्यपत्रे मागवली होती. १८ मेपर्यंत पाच पुरवठादार पुढे आले होते. मात्र कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रियेला आठवड्याभराची मुदतवाढ दिली. या मुदतीत आणखी तीन पुरवठादार पुढे आले. एकूण आठ पुरवठादार कंपन्यांपैकी सात पुरवठादारांनी ‘स्पुटनिक’ लशीच्या पुरवठ्याची तयारी दर्शवली आहे. तर केवळ एका पुरवठादाराने फायझरच्या लशीचा पुरवठा करण्यात स्वारस्य दाखवले होते. परंतु कोणतेही कारण न देता या पुरवठादाराने या जागतिक निविदा प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यामुळे फायझरची लस मिळण्याचा पर्याय बंद झाला आहे.
आठ पुरवठादार कंपन्यांपैकी युरोपातील रोमानिया देशातील ओटू ब्ल्यू एनर्जी एसआरएल या कंपनीने फायझर कंपनीची लस पुरविण्याची तयारी दाखवली होती. मात्र या पुरवठादाराने आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती पालिकेला ईमेलच्या माध्यमातून कळवल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
उर्वरित सात कंपन्यांपैकी पाच कंपन्यांशी अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दृकश्राव्य माध्यमातून चर्चा केली आहे. या सातही पुरवठादारांना काही कागदपत्रेही सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अद्याप या कंपन्यांनी ही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे.
दरम्यान, फायझर कंपनीने थेट पालिके ला नकार कळवलेला नाही तर पुरवठादार कं पनीने माघार घेतली आहे, असे उपायुक्त संजोग कबरे यांनी स्पष्ट केले.