गुजरात येथील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी २२ जणांची निर्दोष सुटका करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात प्रकरणातील साक्षीदाराने केलेली याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणी दिलेला निकाल हा न्यायाची थट्टा असल्याचा आरोप करत महेंद्रसिंह झाला या प्रकरणातील साक्षीदाराने निकालाला आव्हान दिले होते. मात्र महेंद्रसिंह हा काही बॉम्बस्फोटातील पीडित नाही. त्यामुळे त्याला निकालाला आव्हान देण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदल यांच्या खंडपीठाने महेंद्रसिंह याची याचिका फेटाळून लावली. सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि मित्र तुलसीराम प्रजापती या तिघांची हत्या झाल्याचे मान्य करतानाच खटला चालवण्यात आलेल्या २२ जणांनी ही हत्या केल्याचा कुठलाही पुरावा नाही, असा निर्वाळा देत विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. या २२ जणांमध्ये २१ पोलिसांचा समावेश होता. या प्रकरणातील निर्दोष सुटलेल्या वरिष्ठ पोलिसांनी आपल्याकडून खंडणी उकळल्याचा, ती दिली नाही, तर आपल्याला ठार करण्याची धमकी दिल्याचा आरोपही महेंद्रसिंह याने याचिकेत केला होता.