पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पतीला प्रेमविवाहामुळे टोमणे खावे लागतात यामुळे व्यथित झालेल्या ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील महीला पोलीस वैशाली पिंगट (२४) हिने रविवारी सकाळी स्वत:वर पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस ठाण्यातील खोलीत हा प्रकार घडला आहे. ती गर्भवती असल्याने तिच्या मृत्युने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्युपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत स्वखुशीने हे पाऊल उचलले आहे, असे म्हटले आहे.  
वैशालीचा पती विजय लिंगायत (२८) हा याच पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. पाच महिन्यापूर्वी दोघांचा पुनर्विवाह झाला होता. या विवाहामुळे पतीला काही जणांकडून टोमणे मारले जात होते. त्यामुळे आपण व्यथित झाल्याचे  वैशालीने चिठ्ठीत म्हटले आहे. वैशाली शनिवारी रात्रपाळीसाठी पोलीस ठाण्यात कार्यरत होती. यावेळी शस्त्रागारातील पिस्तूलातून तिने स्वतच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. शनिवारी कळवा येथे गेलेले इतर पोलीस कर्मचारी रविवारी सकाळी कार्यालयात आले असता बराच वेळ वैशालीने शस्रगाराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा लोटला, तेव्हा आतमध्ये वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रेल्वे पोलिस याप्रकरणाचा तपास करीत आहेत.