विरारमधील एक विवाहित महिला आणि एका तरुणाने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे विषारी औषध प्राशन केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमध्ये महिलेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला असून, तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत पावलेल्या महिलेचे नाव सोनी मनीष विनायक आहे. तर तरुणाचे नाव अरूण प्रल्हाद नाईक असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले रेल्वे क्रॉसिंगजवळील मंदिराच्या बाजूला या दोघांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास विषारी औषधाचे प्राशन केले. सकाळी तेथून जाणाऱ्या लोकांना हे दोघेही अत्यवस्थ असल्याचे दिसून आल्यावर त्यांना हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे उपचारांपूर्वीच सोनी यांना मृत घोषित करण्यात आले. अरूण याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने कोल्हापूरमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सोनी या १० फेब्रुवारीपासून घरातून बेपत्ता होत्या. त्यांच्या नवऱ्याने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. सोनी आणि अरूण यांनी विषप्राशन का केले, याचा शोध पोलीस घेत आहेत. सोनी यांचे पती मनीष कोल्हापूरला निघाले असून, ते आल्यानंतर त्यांच्याकडेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2016 रोजी प्रकाशित
विरारमधील विवाहित महिला आणि तरुणाकडून हातकणंगलेत विषप्राशन, महिलेचा मृत्यू
मृत पावलेल्या महिलेचे नाव सोनी मनीष विनायक आहे. तर तरुणाचे नाव अरूण प्रल्हाद नाईक असे आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 22-02-2016 at 17:36 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women and young person consume poison in hatkanagale