होळीसाठी वृक्षतोड करणाऱयांना दंडाची आणि कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि महापौर सुनील प्रभू यांनी दिला असतानाच गिरगावमधील चंदनवाडी येथील जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभूमीमधील अंत्यसंस्कारासाठीची लाकडे होळीसाठी विकण्याचा ‘प्रताप’ स्मशानभूमीतील कर्मचाऱयानी केला आहे. ही लाकडे खरेदी करण्यासाठी गिरगाव आणि आसपासच्या परिसरातील अनेक जण रात्रभर चंदनवाडी स्मशानभूमीत येत होते. लाकडे खरेदी करण्यासाठी स्मशानभूमीबाहेर टेम्पो आणि हातगाडय़ांची रांग लागली होती.
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत लाकडे पुरविण्यात येतात. मात्र, हीच लाकडे कर्मचाऱयानी होळीसाठी विकली. सोमवारी रात्री सुरू झालेली ही लाकूड विक्री मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होती. काही जणांना 800 रुपये, तर काही जणांना 600 रुपये प्रतिक्विंटल दराने ही लाकडे विकण्यात आली. विशेष म्हणजे लाकूड खरेदी करणाऱयांना देसाई, अजय अॅंण्ड सन्स या नावाने पावतीही देण्यात येत होती.
शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करुन हा प्रकार उघडकीस आणला आहे.