मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नरिमन पॉइंट ते कफ परेड दरम्यानची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘नरिमन पॉइंट ते कफ परेड सागरीसेतू’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए तयारीला लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका सल्लागार कंपनीने २००७-०८ मध्ये कुलाबा, नरिमन पॉईंट येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नरिमन पॉईंट ते कफ परेड दरम्यान सागरी सेतू बांधण्याचा सल्ला दिला होता. एमएमआरडीएने हा प्रकल्प हाती घेण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरीही मिळविली होती. पण त्यानंतर आजतागायत या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. नरिमन पॉइंटच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला होता. हा प्रकल्प रखडला आणि १०-१२ वर्षांत येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर बनला. या पार्श्वभूमीवर अखेर काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने हा प्रकल्प पुन्हा हाती घेण्याचा निर्णय घेतला. पुढील वर्षी या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

एकूण चार मार्गिका असलेला (येण्यासाठी दोन आणि जाण्यासाठी दोन) हा सागरी सेतू १.६ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यानंतर यासाठी किती खर्च येईल आणि हा प्रकल्प नेमका कसा असेल याचे चित्र स्पष्ट होईल. पण आता शक्य तितक्या लवकर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या समवेत या परिसराची पाहणी केली. मच्छीमारी व्यवसायाला कोणताही फटका बसणार नाही याची खबरदारी घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. या सूचनेनुसार पुढील प्रक्रियेला वेग देत २०२२ मध्ये सागरी कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

आराखडा तयार करण्याचे काम

नरिमन पॉईंट ते कफ परेड सागरी सेतू प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातही मार्ग कुठून आणि कसा जाईल हे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. एकूणच प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी कामाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work on the nariman point to cuffe parade sea bridge ssh
First published on: 04-08-2021 at 03:00 IST