राज्यपालांच्या उपस्थितीत लेखक, कलावंतांची कार्यशाळा

मुंबई : राजभवनात पहिल्यांदाच लेखक व कलाकारांची एक आठवड्याची निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. या कार्यशाळेतून राजभवनात महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे दालन तयार करण्याची सूचना पुढे आली. तर मुंबई विद्यापीठात नृत्य विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे कु लुगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी

सांगितले.

राजभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारची लेखक व कलाकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात इतिहासकार व लेखक डॉ. विक्रम संपत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, रहस्यकथा लेखिका मंजिरी प्रभू, बंगळूरु येथील नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज व दिल्ली येथील सृजनात्मक लेखक व संपादकीय चित्रण कलाकार रणकसिंह मान सहभागी झाले होते.

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना राजभवन येथील भूमिगत बंकरमध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे प्रेरणादायी दालन स्थापन करावे, अशी सूचना संपत यांनी केली.

 राजभवनातील या दालनामध्ये वासुदेव बळवंत फडके, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, चाफेकर बंधू, गणेश वैशंपायन, व्ही.बी. गोगटे, यांच्यासह इतर. क्रांतिकारकांचा समावेश असावा, तसेच १९४६ मध्ये मुंबई येथे रॉयल नेव्ही विरुद्ध झालेल्या नौदलाच्या सशस्त्र लढ्याचा इतिहास नमूद केला जावा, असे त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात ललित कला, लोककला व संगीत विभाग आहे, मात्र नृत्य विभाग नाही, याबाबत नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज यांनी केलेल्या निरीक्षणाची दखल घेऊन लवकरच विद्यापीठात नृत्य विभाग सुरू करण्याबद्दल आपण पावले उचलणार असल्याची माहिती डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली.