|| शैलजा तिवले

हाफकिनमध्ये १७ मजली इमारतीचे नियोजन; उपचार क्षमतेमध्ये दुपटीने वाढ

Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
pune, young engineer girl , overcomes a rare disorder, Treatment of Gartner, Duct Cyst, Marsupialization Procedure, rare disease to girl, rare disease pune, doctor, pune news, marathi news,
अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक

मुंबई : परळ येथील टाटा स्मारक रुग्णालयाची १७ मजली नवीन इमारत हाफकिन संस्थेच्या आवारात उभारली जाणार आहे. या इमारतीमध्ये ५५० कर्करोगबाधित रुग्णांना दाखल करण्याची सुविधा आहे. सुमारे ८४० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

देशात उत्तर प्रदेशपाठोपाठ राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगर प्रदेशामध्ये निदान झालेल्या व्यक्तींपैकी सुमारे ४५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.

टाटा स्मारक रुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालयातील उपचार सुविधा रुग्णांसाठी अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांचा हा वाढता भार लक्षात घेऊन रुग्णालयाने सेवेचा विस्तार करण्याचे नियोजन काही वर्षांपूर्वी केले होते. यासाठी रुग्णालयाजवळील हाफकिन संस्थेमधील सुमारे पाच एकर जागा राज्य सरकारने २०१२ मध्ये रुग्णालयाला दिली आहे. या जागेवर रुग्णालय आता नवी इमारत उभारत असून गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.

‘टाटा स्मारक रुग्णालयात सध्या दरवर्षी ८० हजार रुग्ण नव्याने दाखल होत आहेत. २०३० पर्यंत ही संख्या १ लाख १० हजारांवर जाईल. रुग्णालयाची ही नवी इमारत आकारास आल्यास रुग्णालयातील उपचार सेवांचा विस्तार होईल आणि रुग्णालय प्रशासनावरील रुग्णांचा भार, कामाचा ताणही कमी होण्यास मदत होईल. जागतिक दर्जाचे कर्करोग रुग्णालय उभारून यामध्ये देशाला पुढील ५० वर्षांसाठी आवश्यक उपचार सेवा उपलब्ध करणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश्य आहे,’ असे टाटा स्मारक रुग्णालयाचे उपसंचालक आणि कर्करोग शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आजारोत्तर तपासणी करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सेवा वाढविण्यासाठी उपचारांमधील नवी पद्धती आणि नियमावली विकसित करणे गरजेचे असून यासाठी पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. नव्या इमारतीमुळे पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास कर्करोगाच्या व्यवस्थापनेसह संशोधन आणि साक्षरता करणेही शक्य होईल, असे या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले.

सुविधा काय?

नव्या इमारतीमध्ये १७ मजले आणि ३ तळमजले असणार आहेत. ७५ मीटर उंच असलेल्या या इमारतीमध्ये सुमारे ५५० रुग्णांना दाखल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मेंदूचा कर्करोग, डोक्याचा आणि मानेचा कर्करोग, जठराचा आणि आतड्याचा कर्करोग, छातीच्या अवयवांचा कर्करोग (थोरॅसिक), हाडे आणि पेशींचा कर्करोग अशा पाच प्रकारच्या कर्करोगाचे उपचार येथे उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त बालकांच्या कर्करोगाचा विभागही येथे सुरू होणार आहे.

थोडी माहिती…

महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १ लाख २० हजार नागरिकांना कर्करोगाचे निदान होते. यानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे सुमारे ७८ ते ८५ नवे रुग्ण आढळतात.

सेवाविस्तारासाठी…

राज्यभरात नव्याने निदान होणारे रुग्ण आणि मृत्यू याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये सुमारे २.३% वाढले आहे; परंतु त्या तुलनेमध्ये उपचारांच्या सेवा मर्यादित राहिलेल्या आहेत. त्यांचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे रुग्णालयाजवळील हाफकिन संस्थेमधील जागेत टाटा स्मारक रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे.

कर्करोग उपचारांच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी टाटा स्मारक केंद्राचे प्रयत्न असून देशातील मोठ्या शहरांमध्ये कर्करोग उपचार केंद्र उभारण्यावर भर दिला जात आहे.

– डॉ. राजेंद्र बडवे, संचालक, टाटा स्मारक केंद्र