मुंबई : महासागरांचे संरक्षण आणि संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघांद्वारे दरवर्षी ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राच्या वतीने एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महासागरांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक प्रयत्न’ या विषयावर ही परिषद होणार आहे. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सव्‍‌र्हिसेसचे माजी संचालक डॉ. एस. एस. सी. शेनोई, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माजी उपमहासंचालक डॉ. बी. मीनाकुमारी या परिषदेत संवाद साधणार आहेत. परिसंवादाची सत्रे ‘मस्त्यपालन आणि सागरी परिसंस्था’ व ‘महासागर आणि हवामान’ या दोन विषयांवर आधारित असतील. त्यानंतरच्या सत्रांत सागरी संशोधन क्षेत्रातील आघाडीच्या संशोधकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. परिसंवादाबद्दल अधिक माहितीसाठी https:// cemas. mu. ac. In या संकेतस्थळाला भेट द्यावी. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या यूटय़ूब चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.