आगामी निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांमध्ये जारी होण्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेमध्ये शिवसेना-भाजप युतीची धावपळ उडाली होती. रस्ते, नाले-मोऱ्या, पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती, उद्यानांचे नूतनीकरण आदी कामांपोटी युतीने अवघ्या पावणेदोन तासांमध्ये कंत्राटदारांवर १८०० कोटी रुपयांच्या कामांची खैरात केली. यात १२०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचा समावेश असून मोठय़ा प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेतल्याने मुंबईतील वाहतूक समस्या अधिक जटिल बनण्याची शक्यता आहे. परिणामी, कंत्राटदारांवर खैरात करणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच ‘करून दाखविल्या’ची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेमध्ये बुधवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. राजकीय पक्षांच्या गटनेत्यांसमवेत स्थायी समिती अध्यक्ष, महापौर सुनील प्रभू व्यस्त होते. नगरसेवकांच्या पदरात अतिरिक्त निधी पडावा यासाठी दिवसभर पालिकेत अधिकारी आणि राजकारण्यांमध्ये खल सुरू होते. त्यामुळे विलंबाने सुरू झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राहुल शेवाळे यांनी एकामागून एक ६८ प्रस्ताव पुकारले आणि त्यापैकी तीन प्रस्ताव राखून ठेवत उर्वरित ६५ प्रस्तावांना मंजुरी देत अवघ्या पावणेदोन तासांमध्ये स्थायी समितीचे कामकाज आटोपते घेतले.
डांबरी आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या दुरुस्तीची १२०० कोटी रुपयांची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. सध्या शहरामध्ये मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. असे असताना आता संपूर्ण मुंबईतील अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मंजूर केल्यामुळे येत्या काळात मुंबईतील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
तसेच किनारा रस्ता प्रकल्पासाठीही कोटय़वधी रुपये खर्च करून सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. काही रस्त्यांच्या मूळ प्रस्तावांमध्ये फेरफार करून कोटय़वधींची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती, नाल्यांतील गाळ उपसणे, नाल्यांचे रुंदीकरण, भूमिगत नाल्यांचे नूतनीकरण, नाल्यांवर संरक्षक भिंत उभारणे, पूरनियंत्रणासाठी नाल्यांवरील अडथळे दूर करणे, मोऱ्यांचे बांधकाम, स्मशानभूमीची दुरुस्ती आणि लाकडांचा पुरवठा आदींची कामे हाती घेण्यात आली असून, त्याबाबतच्या ६०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना स्थायी समिती अध्यक्षांनी मंजुरी दिली. एरवी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पार्टीचे नगरसेवक मात्र बुधवारी ‘मंजुरीनाटय़’ सुरू असताना शांत बसून होते.