मराठी साहित्यात लैंगिकता या विषयावरील आपल्या बिनधास्त लेखनाने खळबळ उडवून देणारे, काही वर्षांनंतर धार्मिक, आध्यात्मिक लेखनाकडे वळलेले ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘अबकडई’ या दिवाळी अंकाचे साक्षेपी संपादक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईतील ऑर्थर रोड नाका येथील साईबाबा मंदिरात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.
मराठी साहित्यात आपला स्वत:चा ठसा उमटविणारे आणि स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण करणारे खोत पंधरा ते वीस वर्षे काहीसे अज्ञातवासात गेले होते. ‘लोकसत्ता’सह अन्य प्रसारमाध्यमांनी त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थितीबाबतच्या बातम्या दिल्यानंतर ते पुन्हा प्रकाशझोतात आले होते. त्यांना राज्य सरकारकडून घर मिळवून देण्याचेही प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांना शेवटपर्यंत हक्काचे घर मिळू शकले नाही. गेल्या काही वर्षांपासून ऑर्थर रोड येथील साईबाबा मंदिरात, सातरस्ता येथील पदपथावरचे त्यांचे वास्तव्य होते. ते भावाच्या घरी जाऊन-येऊन असायचे आणि रात्री मंदिरात झोपायचे. तेथेच बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. खोत यांचा पुतण्या अमित याने वरळी स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या वेळी ‘डिंपल प्रकाशन’चे अशोक मुळ्ये, ‘टॉनिक’ मासिकाचे संपादक मानकर काका, विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे संस्थापक दादा गावकर, प्रा. विसुभाऊ बापट, खोत यांचे चाहते उपस्थित होते.   
खोत यांनी लिहिलेल्या ‘उभयान्वयी अव्यय’, ‘बाराखडी’, ‘विषयांतर’ या लैंगिक, पुरुष वेश्या अशा बिनधास्त विषयांवरील कादंबऱ्या गाजल्या. या कादंबऱ्यांनी एकेकाळी मराठी साहित्यात मोठीच खळबळ उडवून दिली. पुढे काही वर्षांनंतर खोत यांनी लेखनाचे विषय बदलले आणि ते धार्मिक व आध्यात्मिक लेखनाकडे वळले. मराठी दिवाळी अंकाच्या परंपरेत ‘अबकडई’च्या रूपाने त्यांनी वेगळी वाट चोखाळली.  अलीकडच्या काळात खोत यांची अनेक पुस्तके ‘डिम्पल प्रकाशन’ या संस्थेने प्रकाशित केली होती. खोत यांनी लिहिलेल्या एका ग्रंथाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

खोत यांची ग्रंथसंपदा
उभयान्वयी अव्यय, बिनधास्त, विषयांतर (कादंबऱ्या)
मर्तिक, अपभ्रंश (काव्यसंग्रह)
दुरेघी (लघु कादंबरी)
चनिया मनिया बोर (मुलांसाठीच्या कथा)
बिंब प्रतिबिंब, दोन डोळे शेजारी, संन्याशाची सावली, अलख निरंजन, अनाथांचा नाथ, सत्याचे प्रयोग, हम गया नहीजिंदा है, गण गण गणात बोते, मेरा नाम है शंकर (धार्मिक आणि आध्यात्मिक लेखन)

चंद्रकांत खोत हे मराठी साहित्यातील एक बंडखोर व्यक्तिमत्त्व होते. आमचा कौटुंबिक ऋणानुबंध होता. खोत हे वाचकप्रिय लेखक होते. त्यांच्या पुस्तकांना वाचकांकडून नेहमीच मागणी असायची.
– अशोक मुळ्ये, डिम्पल प्रकाशन

काल म्हणजे मंगळवारी रात्रीच सातरस्ता येथे मी त्यांना भेटायला गेलो होतो. नेहमीसारख्याच खूप उत्साहात आमच्या गप्पा झाल्या. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्र लेखनाचे काम सुरू केले होते. २० खंडात त्यांना ते आत्मचरित्र वाचकांपुढे आणायचे होते.  
– मानकर काका, ‘टॉनिक’चे संपादक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोत हे एक कलंदर व्यक्ती होते. सर्वसामान्यांपेक्षा ते वेगळे, बिनधास्त आयुष्य जगले. वेगळ्या विषयांवरील लेखनाने त्यांनी मराठी साहित्यात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविला होता.
– दादा गावकर, विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे संस्थापक