प्रसिद्ध नाटककार प्र. ल. मयेकर यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यमय, थरारक अशी विविध प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. ‘रानभूल’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘रमले मी’ ही त्यांची काही गाजलेली नाटके होत.
शिवाजी पार्क स्मशानभूमीत मयेकर यांच्या पार्थिवावर दुपारनंतर अन्त्यसंस्कार करण्यात आले. मयेकर यांचा मुलगा निखिल याने पार्थिवावर अन्त्यसंस्कार केले. ४ एप्रिल १९४६ रोजी जन्मलेल्या मयेकर यांनी कथा, एकांकिका, नाटक असे विपुल लेखन केले होते. व्यावसायिक नाटककार म्हणून प्रसिद्धी मिळण्यापूर्वी मयेकर हे सुमारे दहा वर्षे हौशी रंगभूमीवर एकांकिकाकार व नाटककार म्हणून काम करत होते. काही वर्षे त्यांनी ‘बेस्ट’मध्ये नोकरीही केली.
‘मा अस साबरीन’, ‘अथं मानूस जगन हं’ ही त्यांची सुरुवातीची नाटके होती. मयेकर यांची बहुतांश नाटके ‘चंद्रलेखा’ नाटय़संस्थेतर्फे सादर झाली होती. यात ‘रमले मी’, ‘दीपस्तंभ’, ‘आसू आणि हासू’, ‘गोडगुलाबी’ यांचा समावेश आहे. ‘रातराणी’ आणि ‘पांडगो इलो रे बा इलो’ ही नाटके ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ने रंगभूमीवर आणली होती.
‘मिस्टर नामदेव म्हणे’, ‘तक्षकयाग’, ‘अंत अवशिष्ट’, ‘अग्निपंख’, ‘गंध निशिगंधाचा’, ‘सोनपंखी’ ही त्यांची आणखी काही नाटके आहेत. मयेकर यांचे ‘काचघर’ व ‘मसिहा’ हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. ‘कळसूत्र’, ‘अतिथी’, ‘रक्तप्रपात’ या एकांकिकांचे लेखनही त्यांनी केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्र. ल. मयेकर यांच्या नाटकांमुळे अनेक कलाकारांना रंगभूमीवर चांगल्या भूमिका करता आल्या. जुन्या पिढीतील लेखकांशी नाळ जुळणारा लेखक म्हणूनही त्यांची ओळख होती.  
– मोहन जोशी, अभिनेते व  नाटय़परिषदेचे अध्यक्ष.
****
प्र. ल. मयेकर यांनी वैविध्यपूर्ण विषय नाटकातून हाताळले. सामाजिक जाणिवेचे प्रतिबिंब त्यांच्या नाटकांमधून दिसून येते. ‘रातराणी’ आणि ‘पांडगो इलो रे बा इलो’ ही त्यांची नाटके आम्ही सादर केली. वडीलकीच्या नात्याने आमच्या नाटकांबद्दल ते नेहमीच सल्ला द्यायचे. नाटक कसे लिहावे याचाते आदर्श वस्तुपाठ होते.  
– प्रसाद कांबळी,निर्माते, भद्रकाली नाटय़संस्था.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer p l mayekar passed away
First published on: 19-08-2015 at 12:59 IST