मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याने किंवा काही नेत्यांची पूर्ण सुरक्षा काढल्याने त्यांना आता केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविली जाणार आहे. राज्यातील भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले आहे, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. भाजप खासदार नारायण राणे यांना केंद्र सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

आघाडी सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांची सुरक्षा कमी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. आशिष शेलार, उपाध्यक्ष माधव भांडारी, आमदार प्रसाद लाड आदींच्या सुरक्षेत मोठी कपात केली आहे किंवा ती काढून घेतली आहे. त्यामुळे भाजप नेते अस्वस्थ होते. राणे यांना आता वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असून त्यात दोन कमांडो, दोन व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी व अन्य जवान अशा १२ जणांचा समावेश आहे.