मुंबई : गेली काही वर्ष सातत्याने ॲमेझॉन प्राईम व्हिडिओकडून वेबमालिका वा अन्य आशयाच्या प्रसारणादरम्यान जाहिराती सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. प्राईम व्हिडिओवर जानेवारी २०२४ मध्ये जाहिराती सुरू होणार, अशी घोषणाही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी वेळ घेणाऱ्या प्राईम व्हिडिओने अखेर येत्या १७ जूनपासून वाहिनीवर मर्यादित स्वरुपात जाहिराती दाखवण्यात येणार, असे जाहीर केले आहे. पूर्णपणे जाहिरातमुक्त आशय पाहण्यासाठी प्रेक्षकांना दर महिन्याला अधिकीचे १२९ रुपये मोजावे लागणार आहेत.

दूरचित्रवाहिन्यांप्रमाणे ओटीटीवर वेबमालिका वा वेबपट पाहताना जाहिराती मध्ये मध्ये येत नाहीत. त्यामुळे ओटीटीकडे वळणाऱ्या प्रेक्षकांसाठी जाहिरातीविना असलेला आशय हाही एक निकष होता. मात्र, डिस्ने हॉटस्टार वाहिनीने करोनानंतर जाहिराती दाखवण्यास सुरूवात केली. जाहिरातमुक्त आशय पाहण्यासाठी प्रेक्षकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. त्यानंतर झी ५ सारख्या स्थानिक वाहिन्यांवरही जाहिराती दाखवण्यास सुरूवात झाली. सद्यस्थितीत नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ या दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय ओटीटी वाहिन्या जाहिरातमुक्त आशय दाखवत होत्या. मात्र, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने गेल्या दोन वर्षांत अनेकदा मर्यादित स्वरुपात जाहिराती सुरू करण्याचे संकेत दिले होते. यावेळी मात्र प्राईम व्हिडिओकडून वाहिनीच्या सशुल्क प्रेक्षक सदस्यांना येत्या १७ जूनपासून जाहिराती दाखवण्यात येणार असल्याचे मेलद्वारे कळवण्यात आले आहे.

प्राईम व्हिडिओने १७ जूनपासून मर्यादित स्वरुपात वाहिनीवर जाहिराती दाखवण्यात येणार असल्याची माहिती दिली. वेबमालिका, वेबपट किंवा ओटीटी वाहिनीवरील अन्य आशय पाहताना दाखवण्यात येणाऱ्या या जाहिरातींचे प्रमाण दूरचित्रवाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती वा अन्य ओटीटी आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींपेक्षा निश्चित कमी असणार आहे, असेही प्राईम व्हिडिओच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या सशुल्क सदस्याच्या दरयोजनांमध्ये काहीही बदल होणार नाही. त्यांनी निवडलेल्या त्यांच्या प्लॅननुसारच प्राईम व्हिडिओवरचा आशय त्यांना पाहता येणार आहे. मात्र, ज्यांना पूर्णपणे जाहिरातमुक्त आशय पाहायचा आहे, त्यांना वेगळा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्याच्या प्लॅनबरोबर जाहिरातमुक्त आशय पाहण्यासाठी अतिरिक्त १२९ रुपये मोजावे लागणार आहेत. ज्यांना हे अतिरिक्त शुल्क भरायचे नसेल त्यांना आहे त्या प्लॅनप्रमाणे जाहिरातींचा व्यत्यय सहन करत प्राईम व्हिडिओवरचा आशय पाहावा लागणार आहे. याशिवाय, ॲपल टीव्ही, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, बीबीसी प्लस, एमजीएम प्लस अशा अन्य ओटीटी वाहिन्यांवरचा आशय अतिरिक्त शुल्क भरून प्राईम व्हिडिओवर दाखवण्यात येतो. त्याच्या दरपत्रकात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचे प्राईम व्हिडिओने स्पष्ट केले.