मागील पाच वर्षे शिवसेना सत्तेत असताना सातत्याने जनतेचा आवाज उठवत आली आहे. शिवसेनेचा जन्म सत्ता प्राप्तीसाठी झालेला नाही. न्याय हक्काच्या लढ्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. याचबरोबर ब्ल्यू सीच्या पत्रकार परिषदेतील जबाबदारी आणि अधिकार यांचे समसमान वाटप हा अतिशय महत्त्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे २४ तारखेला निकाल आल्याच्या आठ-दहा दिवसात मंत्रिमंडळ स्थापन होईल, तेव्हा समसमान वाटप म्हणजे काय हे लोकांना कळले, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझावर घेतलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

संघर्षाला कारणं लागतात तशी युतीसाठी देखील लागतात, शिवसेना आणि भाजपा एका विचारधारेचे पक्ष असल्याने पुन्हा एकत्र आले आहेत. मात्र असे जरी असले तरी शिवसेनेची गर्जना अजिबात कमी झालेली नाही. जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे शिवसेना आवाज उठवणारच. मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल पीक विम्याचा असेल अथवा कोणताही असेल त्यावर शिवसेना गर्जना करणारच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

यावेळी युतीचे भविष्यात ‘क्रॅश लॅण्डिंग’ होण्याची शक्यता वाटते का? असे विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे यांनी असे अजिबात वाटत नसल्याचे ठामपणे सांगितले. तसेच, युती ही एका निर्धाराने केली असल्याचे ते म्हणाले. मी युतीत तडजोड जरी केली असली तरी, ती मी माझ्या महाराष्ट्रासाठी केली आहे. आज कोण कसं वागत आहे, हे अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. युतीतील १२४ हा आकडा शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात कमी जरी असला तरी, शिवसेनेच्या जास्तीत जास्त आमदारांच्या आकड्याची सुरूवात याच आकड्यापासून होणार आहे. शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार जिंकण्याची सुरूवात होण्याचा हा पहिला टप्पा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

‘समसमान’ हा करार युतीत मोडला गेला असं तुम्हाला वाटत का ? असे विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाही. समजुतदारपणा हा आम्ही दाखवला आहे. ब्ल्यू सीच्या पत्रकार परिषदेत जबाबदारी आणि अधिकार यांच समसमान वाटप हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे २४ तारखेला निकाल आल्याच्या आठ-दहा दिवसात मंत्रिमंडळ स्थापन होईल. तेव्हा समसमान वाटप म्हणजे काय हे लोकांना कळले, माझा त्याच्यावर विश्वास आहे. असा सुचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.