दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सावली अदृश्य होणार
माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. मात्र सोमवारी ही सावली आपली साथ सोडणार आहे. आपली स्वत:ची सावली अदृश्य झाल्याचा अनुभव सोमवारी, १५ मे रोजी दुपारी मुंबईकरांना घेता येणार आहे. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभवता घेता येणार आहे.
सावली ही आपली पाठ सोडत नाही. पण निसर्ग आणि भूगोलातील काही घडामोडींमुळे सावलीही आपली पाठ सोडणार असल्याचा अनुभव मुंबईकरांना सोमवारी मध्यान्ही म्हणजे ठीक १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने सावली अगदी पायाशी आल्याने अदृश्य होणार आहे, असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. माणसाची सावली अदृश्य होण्याच्या या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत ‘शून्य सावली दिवस’ (झिरो शॅडो डे) असे म्हटले जाते. वर्षांतून दोन वेळा आपल्याला हा अनुभव घेता येतो.
सावली का गायब होते?
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितिजावरची जागा बदलत असते. सुमारे २३ डिसेंबर ते २१ जून सूर्याचे उत्तरायण असते तर त्यानंतर दक्षिणायन. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते, असे मुंबईतील नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले.