मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्य दिनी जिल्ह्य़ातील ५०० गावे डिजीटल करण्याची आणि ५० सेवा ऑनलाईन करण्याची घोषणा करणार आहेत.डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व २८ हजार ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेट पुरवण्यात येणार आहे. हे करताना ग्राम पंचायत कार्यालय, आरोग्य केंद्र आणि शाळांना प्राधान्य दिले जाणार आहे.
डिजीटल इंडियाच्या धर्तीवर राज्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी शासनाने प्रायोगिक तत्त्वावर नागपूर जिल्ह्य़ाची निवड केली असून यासंदर्भात अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वातंत्र दिनी करणार आहेत. या योजने अंतर्गत गावातील शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतरही शासकीय कार्यालये मुख्यालयांशी जोडण्यात येणार आहेत. वायफाय सुविधाही तेथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री १५ ऑगस्टला काही शाळा आणि अंगणवाडी केंद्रातील मुलांशी थेट संवादही साधणार आहेत. यापूर्वी नागपूर जिल्ह्य़ातील विहीरगाव, दाभा, खंडाळा, खसळा आणि तरोडी बुद्रुक ही पाच गावे डिजीटल करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात ५०० गावांची निवड करण्यात आली आहे. २ ऑक्टोबपर्यंत संपूर्ण जिल्हा डिजीटल करण्याची योजना आहे.