वर्ग एकचा एकही मनोविकारतज्ज्ञ नाही; माहितीच्या अधिकारातून उघड

नागपूर : उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात वर्ग एकचे एकही मनोविकारतज्ज्ञ नाहीत. गेल्या साडेचार वर्षांत येथे उपचार घेणाऱ्या ११४ मनोरुग्णांचा मृत्यू झाला.येथील सर्वच संवर्गातील ३९ टक्के पदे रिक्त असल्याने रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळणार कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव समोर आणले आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालयात दगावणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी एका रुग्णाच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. शासनाकडून येथील मृत्यूंची उच्चस्तरीय चौकशी झाली होती. काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. परंतु अद्याप येथील मनोविकृती तज्ज्ञांसह इतर सगळी पदे भरण्यासह अव्यवस्था दूर करण्यासाठी ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही. मनोरुग्णालयात वर्ग एक ते चार पर्यंतची ३७५ पदे मंजूर आहेत. त्यातील १४६ पदे रिक्त असून केवळ २२८ जणांच्या भरोशावर काम सुरू आहे. वर्ग १ च्या मनोविकार तज्ज्ञांची एकूण ९ पदे येथे मंजूर आहेत. त्यातील ८ पदे रिक्त असून एक डॉ. बागलाने नावाचे अधिकारी अनेक महिन्यांपासून कर्तव्यावर येत नसल्याने हे पद रिक्त सदृश्यच आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षांत ११ पुरुष, ६ महिला अशा एकूण १७ मनोरुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१६- १७ मध्ये २१ पुरुष, १० महिला अशा ३१ जणांचा मृत्यू झाला. २०१७- १८ मध्ये १३ पुरुष, ९ महिला अशा २२ जणांचा, २०१८-१९ मध्ये १८ पुरुष, १२ महिला अशा ३० जणांचा, एप्रिल-२०१९ ते १३- १२- १९ पर्यंत  ७ पुरुष आणि ७ महिला अशा १४ जणांचा मृत्यू नोंदवला गेल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले.

बाह्य़रुग्ण वाढले, आंतररुग्णांचा टक्का घसरला

मनोरुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात २०१५- १६ मध्ये ४२,०३० जुने तर २,६७६ नवीन असे एकूण ४४ हजार ७०६ रुग्ण नोंदवले गेले होते. ही संख्या २०१८-१९ मध्ये ५४ हजार ४२४ रुग्णांवर पोहचली. २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत येथे ४३ हजार ६८३ रुग्णांवर उपचार झाले, तर आंतररुग्ण विभागात मात्र २०१६-१७ मध्ये ७०८ जुन्या तर ६,८०५ नवीन अशा एकूण ७ हजार ५१३ रुग्णांना दाखल करून उपचार दिले गेले. ही संख्या २०१८-१९ मध्ये कमी होऊन एकूण ६ हजार ४९४ वर आली. २०१९ ते डिसेंबर २०२० दरम्यान येथे आंतररुग्णांची संख्या आणखी कमी होऊन ४ हजार ६५८ वर आली असल्याचे पुढे आले आहे.