कुटुंबीय, मित्रांसह कौटुंबिक डॉक्टरचा समावेश; मेडिकल, मेयोतील संशयितांची संख्या २१ वर

नागपूर : उपराजधानीतील करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले कुटुंबीय, मित्र, कौटुंबिक डॉक्टर अशा १३ जणांना आज गुरुवारी आरोग्य विभागाकडून खबरदारी म्हणून मेडिकलला दाखल करण्यात आले.

सगळ्यांचे  नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू  प्रयोगशाळेच्या मेयोतील केंद्रात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मेडिकल, मेयोतील करोना संशयितांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

सध्या उपचार सुरू असलेल्या करोनाग्रस्त अमेरिकेतून दोहा मार्गे ५ मार्चला  नागपूरला पोहचला व दुसऱ्याच दिवशी आजारी पडला.  त्याने सुरुवातीला कौटुंबिक डॉक्टरकडून उपचार घेतले.

परंतु आराम न मिळाल्याने त्याला मेयोच्या प्रयोगशाळेत नमुने तपासण्यासाठी पाठवले गेले. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट होताच आरोग्य विभागाचे धाबे दणाणले.

तातडीने  त्याच्या संपर्कातील त्याचा वाहनचालक, दोन मित्र, त्याचे आई-वडील, पत्नी, मुलांसह इतर एकूण अशा १३ जणांना मेडिकलला दाखल करण्यात आले. दुबईहून आलेला आणखी एक रुग्णही गुरुवारी मेडिकलला दाखल झाला.

मेयोतही सहा संशयितांना दाखल करण्यात आले आहे.  दरम्यान, रात्री उशिरा मेयोत दाखल सहा संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला असून मेडिकलमधील जर्मनीच्या महिलेलाही करोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जेवणाबाबत तक्रार

करोनाग्रस्ताच्या संपर्कातील मेडिकलला दाखल केलेले व्यक्ती हे चांगल्या घरातील आहेत. त्यांना करोनाची लक्षणेही नाहीत. परंतु शासनाच्या सूचनेनुसार त्यांना दाखल केल्यावर प्रथमच त्यांनी मेडिकलचे जेवण घेतले. ते न आवडल्याने घरी जाऊ देण्याचा तगादा लावला. आता या सगळ्यांना त्यांच्या आवडीनुसार जेवण द्यायचे कसे,  हा प्रश्न मेडिकलला पडला आहे.

मेयोत संपर्कात आलेल्यांचे काय?

मेयोच्या बाह्य़रुग्ण विभागात बुधवारी तीन हजारांच्या जवळपास रुग्ण नोंदवण्यात आले. हा करोनाग्रस्त रुग्ण येथे  उपचाराला आला असता येथे रुग्णांची गर्दी होती.  रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना विषाणूची लागण होण्याचा धोका जास्त असतो.  त्यामुळे या रुग्णांचा शोध लागणार कसा, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासनाने मात्र या रुग्णापासून इतरांचे अंतर जास्त असल्याने कुणालाही धोका नसल्याचा दावा केला.