२०११मध्येच कुलपतींना अहवाल सादर; रोजगारनिर्मितीचे स्वप्न अध्र्यावर
मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता या स्वतंत्र विभागाची एकीकडे निर्मिती केली. मात्र, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या हेतूने विदर्भातील कृषी आणि अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या साक्षीने तयार करण्यात आलेल्या २८८ कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची मात्र, वासलात लावण्यात आली.
तरुणांनी कौशल्ये आत्मसात करावीत आणि त्याचा फायदा त्यांना रोजगारात व्हावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास खात्याची निर्मिती केली. पाच वर्षांपूर्वी २८८ कौशल्य विकास अभ्यासक्रमांची निर्मिती ‘एमएआरडी’चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आर.सी. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने केली होती. त्यापैकी एकही अभ्यासक्रम विदर्भाच्या कोणत्याच विद्यापीठात आणि संस्थेत सुरू झालेला नाही. आठ-नऊ वर्षांपूर्वी मिहानमुळे नागपूर जगाच्या नकाशावर येणार, नागपूरचा मिहानमुळे कायापालट होऊन लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होणार अशी बतावणी करून खासगी लोकांनी हवाई सुंदरी, विमानाशी संबंधित कामांसाठी मनुष्यबळ लागेल म्हणून अभ्यासक्रम तयार केले होते. त्यासाठी मोठमोठय़ा जाहिराती प्रसिद्ध करून एकेक लाख, दीड लाख रुपये प्रवेश शुल्क वसूल केले होते. म्हणजे मिहानच्या नावाखाली ती सर्व फसवणूक होत होती. त्याचवेळी अशी व्यावसायिक अभ्यासक्रमांची निर्मिती करून शासनानेच कौशल्य प्राप्त तरुण का घडवू नयेत, असा विचार पुढे आला आणि राज्यपालांनी महाराष्ट्र विमान विकास मंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आर.सी. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली ‘हाय स्किल मॅन पावर फॉर मिहान समिती’ स्थापन केली होती. त्याचे संयोजक नागपूर विद्यापीठावरील तत्कालीन कुलपती नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय खडक्कार होते.
या कौशल्य विकास अभ्यासक्रमांची पाश्र्वभूमी अशी की, मिहानमुळे लाखोंच्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, अशी दिवास्वप्ने दाखवून २८८ विविध कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आले. या समितीच्या बैठकांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. श.नु. पठाण, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंह, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. कृष्णकुमार, उच्च शिक्षण तसेच तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक, तंत्रनिकेतनचे प्राचार्य, आयटीआयचे प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता. या समितीने २०११मध्ये कुलपतींना अहवाल सादर केला होता. मात्र, त्यानंतर शासनाच्या दप्तर दिरंगाईत हे अभ्यासक्रम अडकले.
‘हाय स्किल मॅन पावर फॉर मिहान’ समितीचे संयोजक डॉ. संजय खडक्कार म्हणाले, २२ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना त्या २८८ कौशल्य विकास अभ्यासक्रमांची आठवण करून दिली. विदर्भातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी, सहसंचालकांनी एकत्र येऊन या अभ्यासक्रमांच्या निर्मितीत हातभार लावला होता. मात्र, त्यापैकी एकही अभ्यासक्रम अद्याप सुरू झालेला नाही. या अभ्यासक्रमांचे घोडे निधी अभावी रखडले असून हे अभ्यासक्रम तरुणांच्या पर्यायाने विदर्भाच्या आर्थिक सुबत्तेसाठी फार महत्त्वाचे आहेत. मिहानच्या नावाखाली खासगी लोकांची दुकानदारी बंद होऊन शासनानेच त्यात पुढाकार घेऊन हे अभ्यासक्रम तयार केले होते. मात्र, त्यानंतर शासन पातळीवर त्याचे काहीही होऊ शकले नाही.