‘फिशिंग’द्वारे २४ टक्के लोकांची फसवणूक

मंगेश राऊत, नागपूर</strong>

काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. यासंदर्भात अमेरिकेतील ‘आयट’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार अशा प्रकरणात ४० टक्के वृद्धांची अशी फसवणूक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोबाईलवर अनोळखी इसमांशी बोलताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांची क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डची मुदत संपल्याचे सांगून माहिती मिळवण्यात आली व अनुक्रमे साडेचार लाख व सव्वा लाखाने फसवणूक करण्यात आली. अशाप्रकारे अनेक वृद्धांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांची व्यक्तिगत माहिती मिळवून फसवणूक केली जाते. यात तरुणांच्याही फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. कॉल सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची मुदत संपली असून आपण बँकेतून बोलत असल्याने ओटीपी सांगितल्याने ते बंद पडणार नाही, संबंधित कंपनीत केलेली गुंतवणूक दुपटीने परत मिळवण्यासाठी काही पैसे भरावे लागेल, अशाप्रकारे अनेकांची फसवणूक होत आहे. याला आधुनिक भाषेत ‘फिशिंग’ असे म्हणतात.

शहराचा विचार केला तर प्रत्येक पोलीस ठाण्यात रोजचा एक गुन्हा ऑनलाईन फसवणुकीचा आहे. ऑनलाईन फसवणुकीची समस्या अमेरिकेसारख्या देशालाही भेडसावत आहे. त्यामुळे अमेरिकेतील ‘आयट’ या संस्थेने मार्च २०१८ ते जून २०१८ मध्ये ऑनलाईन सव्रेक्षण केले. त्याच्या निष्कर्षांनुसार एकूण फसलेल्या लोकांपैकी ४० टक्के हे वृद्ध आहेत, तर  एकूण ऑनलाईन फसवणुकीपैकी २४ टक्के लोकांची फसवणूक ‘फिशिंग’द्वारा होत आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भ्रमणध्वनीवरून आपली वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती देऊ नये. फिशिंगचे भ्रमणध्वनी आल्यास ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार द्यावी, हा यावरील उपाय ठरू शकेल.

बँकांची फसवणूक

ऑनलाईन फसवणूक होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे बँकांचीही फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. बँकांची होणारी एकूण फसवणूक लक्षात घेता, बनावट दस्तावेजांच्या आधारांवर बँकांकडून पहिल्यांदा कर्ज घेऊन ते परत न करता फसवणूक करणाऱ्या लोकांचे प्रमाण ७६ टक्के आहे. त्यामुळे बँकांनाही कर्ज उपलब्ध करून देताना संबंधितांची योग्य ती पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.