विद्यार्थ्यांचा अभाव, अनियमितता कारणीभूत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची तब्बल ७७ महाविद्यालये संस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांचा अभाव यामुळे बंद पडली आहेत. विद्यापीठाच्या वार्षिक अहवालात याची नोंद आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नागपूरसह वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्य़ापर्यंत विस्तारलेले आहे. सद्य:स्थितीत सरासरी ६६४ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत, असे सांगितले जाते. यापैकी ७७ महाविद्यालये बंद आहेत. ५८७ सुरू आहेत. त्यानुषंगाने प्राध्यापक, ग्रंथालय, प्रयोगशाळा किंवा इतर पायाभूत सुविधा आहेत, असे म्हणता येते.

बंद झालेली ७७ महाविद्यालये सर्वच अभ्यासक्रमांची म्हणजे कला, वाणिज्य, विज्ञान, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र, माहिती व ग्रंथालयशास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विधि, गृहविज्ञान आणि इतरही अभ्यासक्रमांची असून त्याची नोंद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वार्षिक अहवालात आहे. कुठल्याही विद्यापीठाचा वार्षिक अहवाल अतिशय महत्त्वाचा समजला जातो. कारण महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४च्या कलम १०४नुसार तो विधिमंडळात ठेवून संमत केला जातो. या वार्षिक अहवालात ७७ महाविद्यालय बंद झाल्याचे विवरण आले आहे. सोबतच ज्या महाविद्यालयांकडून माहिती अपात्र आहे. त्याची नोंद अहवालात घेण्यात आली आहे. माजी बीसीयूडी संचालक डॉ. डी.के. अग्रवाल यांनी २०१५-१६च्या वार्षिक अहवालाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

बंद करण्यात आलेली काही महाविद्यालये

वानाडोंगरीचे शरद पवार फार्मसी आणि बापूराव देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, श्री निकेतन कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, इंदिराबाई ग्रंथालय व माहितीशास्त्र, सिरसपेठेतील डीबीएम, वर्धमाननगरातील कला व वाणिज्य, इसासनीचे कोष, नंदनवनचे कला व वाणिज्य, शिवाजीनगरातील पीजी व्यवस्थापन संस्था, वाडीचे चैतन्य इन्स्टिटय़ूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट, प्रियदर्शिनी एमसीए महाविद्यालय, रामदासपेठेतील कॅप्स कॉलेज, देवनगरचे महिला विधि महाविद्यालय, धंतोलीतील मुकेश गुप्ता कॉलेज, ओकारनगरातील चक्रपाणी महाविद्यालय, कलासागर चित्रकला महाविद्यालय, डवलामेटीचे मोतीलाल ओझा संस्था, दिघोरीतील मधुकर महाकाळकर कॉलेज, नंदनवनचे अखिलेश मॅनेजमेंट संस्था आणि भोसला मॅनेजमेंट संस्था, कोराडी मार्गावरील मॉडर्न कॉलेज, कामठीमार्गावरील मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, मेडिकल चौकातील चंद्रशेखर हांडा कॉलेज, हिवरी लेआऊटमधील वाणिज्य कॉलेज तसेच विनोबा भावे कला व वाणिज्य कॉलेज इत्यादींचा बंद करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये समावेश आहे.

वार्षिक अहवाल तयार करताना अनेक महाविद्यालयांना आम्ही त्यांच्या कॉलेजची माहिती विचारायचो. स्मरणपत्रे पाठवूनही त्यांच्याकडून प्रतिसाद येत नसायचा. मात्र, बहुतेक महाविद्यालयांनी माहिती पाठवली होती. जी ७७ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. ती बीसीयूडीनेच बंद केलेली आहेत. सोबतच ज्यांनी माहिती दिली नाही. त्यांना आर्थिक दंडही करण्यात आला आहे.

– डॉ. डी.के. अग्रवाल, अध्यक्ष वार्षिक अहवाल समिती,