मृत्यू कमी दाखवण्याची खासगीची क्लृप्ती असल्याची चर्चा

नागपूर : उपराजधानीतील खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे करोनाचे मृत्यू कमी दाखवण्यासाठी नवीन क्लृप्ती वापरणे सुरू केल्याची जोरदार चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे.

त्यानुसार खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान करोनाबाधिताची प्रकृती खूप खालावल्यास हे रुग्ण मेडिकल- मेयोत कोणत्याही वेळी हलवले जातात. आजपर्यंत हलवलेल्या ३१५ पैकी तब्बल ९० टक्के रुग्णांचा मृत्यू मेडिकल-मेयोत झाला आहे.

नागपूर जिल्ह्य़ात करोनाचा शिरकाव झाल्यावर प्रथम मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतच सोय करण्यात आली होती. जुलै-ऑगस्ट या महिन्यात करोना हाताबाहेर गेल्यावर येथील खासगी रुग्णालयांनाही बाधितांवर उपचाराची सक्ती केली गेली. दरम्यान, सुरुवातीला खासगी रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्ण घेतलेच जात

नव्हते. त्यानंतरही खासगीत दाखल झालेले रुग्णाची प्रकृती खालावल्यावर हे रुग्ण विविध बहाण्याने मेडिकल-मेयोत हलवले जाऊ लागले. खूपच प्रकृती चिंताजनक असलेले रुग्ण मध्यरात्रीनंतरही दोन्ही ठिकाणी येण्याचे प्रमाण मध्यंतरी वाढू लागले होते. त्यामुळे शासकीय रुग्णालयांत बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले.

मेडिकलमध्ये आजपर्यंत १ हजार ६५३ करोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. त्यात खासगी रुग्णालयांतून येथे हलवलेल्या २८३ मृत्यूंचा समावेश आहे. दरम्यान, येथे खासगीतून आजपर्यंत ३१५ हून अधिक रुग्ण हलवले असताना त्यातील मृत्यूचे प्रमाण सुमारे ९० टक्के नोंदवले गेले. दरम्यान, मेडिकलमध्ये आजपर्यंत दगावलेल्या अवस्थेत तब्बल ३१६ करोनाबाधित रुग्ण आले. त्यातीलही काही खासगी रुग्णालयातून येथे हलवतांना रस्त्यातच दगावलेले आहेत.

त्यामुळे खासगी रुग्णालयांना रुग्ण हलवताना काहीही नियम महापालिकेकडून घालण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य पथकाच्या निदर्शनात हा प्रकार मेडिकल-मेयोच्या रुग्णालय प्रशासनाकडून आणून दिला गेला. मेयोची आकडेवारी प्राप्त झाली नसली तरी तेथेही जवळपास हीच स्थिती असल्याचे एका अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले. तर मेडिकलच्या जनसंपर्क विभागानेही येथे खासगीतून हलवलेल्यांपैकी ९० टक्के रुग्णांचा ते खूपच खालवलेल्या अवस्थेत येथे येत असल्याने मृत्यू होत असल्याचे मान्य केले.