News Flash

पूर्व विदर्भात उष्माघाताचे ९५ रुग्ण

गेले दोन दिवस सोडले तर उपराजधानीसह पूर्वविदर्भात तापमान चांगलेच वाढले आहे.

नागपुरात सर्वाधिक ८० रुग्ण
गेले दोन दिवस सोडले तर उपराजधानीसह पूर्वविदर्भात तापमान चांगलेच वाढले आहे. त्यामुळे सहा जिल्ह्य़ांतील शासकीय व खासगी रुग्णालयांत विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या रांगा वाढल्या आहेत. त्यानंतरही उष्माघातग्रस्तांच्या कमी नोंदी महापालिकेसह सार्वजनिक आरोग्य विभागाकडे आहेत. पूर्व विदर्भात एकूण ९५ रुग्ण नोंदविण्यात आले असून त्यातील ८० रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत. याची अल्प नोंदणी बघता त्यात अचूकता येणार कधी? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागपूरची भौगोलिक स्थिती बघितली तर प्रत्येक वर्षी मे महिन्यात येथील तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या जवळपास असते. गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शहरातील तापमानात घट झाली आहे. परंतु त्यानंतरही दुपारी उन्हाने नागरिकांना उकाडय़ाचा चांगलाच त्रास जाणवत आहे.
गेल्या दोन दिवसांचे तापमान सोडले तर त्यापूर्वी अनेक दिवस येथील तापमानात चांगलीच वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे नागपूरसह पूर्व विदर्भात तापासह गॅस्ट्रो, अतिसार यासह उन्हामुळे होणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयो, आयसोलेशन रुग्णालयातच गेल्या दहा दिवसांत १७५ ते २०० गॅस्ट्रो वा त्यासदृष्य आजारांच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
या रुग्णांना उन्हापासून त्रास झाल्यास त्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे होणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेची उष्माघाताशी संबंधित रुग्ण नोंदवण्याची यंत्रणाच कुचकामी असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे येथे केवळ काही खासगी रुग्णालयांसह इतर काही रुग्णांच्याच नोंदी केल्या जातात. सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे शहरात आतापर्यंत उन्हाशी संबंधित आजाराचे केवळ ८० रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे नागपूर ग्रामीणसह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा या जिल्ह्य़ात केवळ १५ रुग्ण नोंदवले गेले. या अल्प नोंदी बघता दोन्ही शासकीय संस्थांमध्ये उन्हापासूनच्या प्रत्येक रुग्णांची नोंद अचूक पद्धतीने होणार कधी? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

एकाही मृत्यूची नोंद नाही
नागपूरसह पूर्व विदर्भात उन्हाशी संबंधित आजाराचे रुग्ण वाढले आहेत, पैकी काहींचा उपचारादरम्यान मृत्यूही होतो. गंभीर आजार असलेल्या व रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णाची उन्हामुळे प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाल्यास हा मृत्यू पूर्वीच्या गंभीर आजारातच घेतल्या जात आहे. त्यामुळे उष्माघातापासूनचा मृत्यू पुढे येत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्य़ांत सध्या एकाही उष्माघाताच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे नाही, हे विशेष.

उष्माघाताच्या नोंदी जिल्हा रुग्ण
नागपूर (शहर)         ८०
नागपूर (ग्रामीण)   ३
चंद्रपूर                   १२
गडचिरोली            ०
गोंदिया                 ०
भंडारा                   ०
……………..
एकूण                  ९५
………………

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 4:44 am

Web Title: 95 patients of heat stroke in east vidarbha
टॅग : Patients
Next Stories
1 ’त्या’ गावांमध्ये डिजिटल क्लासरूम अन् ग्रंथालयेही!
2 युग चांडक हत्याप्रकरणी दोघांना फाशीच
3 विदर्भात अवकाळी वादळी पाऊस
Just Now!
X