‘आयसीएमआर’च्या दिशानिर्देशांचे पालन गरजेचे; आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

अकोला : करोनाबाधितांवरील उपचारात वापरल्या जाणारे ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’चा गरज नसताना किंवा अतिरेकी प्रमाणात वापर होतो. परिणामी, गरजू रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होतात. हे टाळण्यासाठी ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’चा योग्य वापर होणे आवश्यक आहे. यासाठी ‘आयसीएमआर’ व राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत वाशीमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी व्यक्त केले.

‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ करोनाबाधितांवरील उपचारासाठी सहाय्यभूत ठरत असले तरी ते कोणत्या रुग्णांना द्यावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटना तसेच ‘आयसीएमआर’ व राज्यस्तरीय टास्क फोर्सने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार ‘आरटीपीसीआर’ चाचणीत करोना बाधित आढळलेल्या रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूची पातळी ९४ पेक्षा कमी आढळल्यास त्याची आरोग्यस्थिती पाहून त्याला ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ देण्याचा निर्णय संबंधित कोविड रुग्णालयाचे डॉक्टर घेऊ शकतात. मात्र, करोना चाचणी न करता केवळ ‘एचआरसीटी’ चाचणीच्या आधारे किंवा ओरोना चाचणी नकारात्मक असलेल्या रुग्णांना सुद्धा हे इंजेक्शन देण्याचा आग्रह होतो, हे पूर्णत: चुकीचे आहे. तसेच ज्या बाधिताला करोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, मात्र शरीरातील प्राणवायूची पातळी ९४ पेक्षा अधिक आहे, अशा रुग्णांना सुद्धा ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ देण्याची आवश्यकता नसते, असे डॉ.राठोड म्हणाले.

मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या रक्ताची तपासणी करून, तसेच ‘एचआरसीटी’ चाचणीचे गुणांकन ९ पेक्षा अधिक असल्यास रुग्णास ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ देण्याबाबत सुचवण्यात आले आहे, असे डॉ.आहेर म्हणाले. तज्ज्ञांच्या सल्ल्याने व मार्गदर्शक सूचनांनुसार वापर योग्य रुग्णांवर करण्यात यावा. या इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ हे करोनाबाधितांवरील उपचाराचा एक भाग आहे. बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर इंजेक्शनच्या वापराविषयी निर्णय घेत असतात. इंजेक्शन दिले म्हणजे रुग्ण बरा होईल, असा समज असतो. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शन हे करोना संसर्गावरील रामबाण उपाय नाही, तो केवळ या उपचाराचा एक भाग आहे, असे डॉ. कावरखे यांनी सांगितले.