युवकाच्या मृत्यूनंतर प्रशासकीय पातळीवर पेच

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : येथील यशोधरानगर परिसरात अपघातानंतर दगावलेला २४ वर्षीय करोनाबाधित तरुणाची नोंद करोनाच्या संवर्गात की इतर संवर्गात होणार हा नवीन पेच जिल्ह्य़ातील प्रशासकीय पातळीवर निर्माण झाला आहे. दरम्यान, आरोग्य खात्याचे करोना मृत्यू नोंदीबाबत नवीन आदेश नागपूरसह इतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात पोहोचले आहेत. त्यात अपघात, आत्महत्या, खून यामुळे झालेले मृत्यू  वगळता इतरांची नोंद करोनाच्या संवर्गात करण्याच्या सूचना आहेत, हे विशेष.

मुंबईसह इतरत्र करोनाच्या बऱ्याच मृत्यूंची नोंद केली गेली नव्हती. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही नेत्यांनी सरकारला धारेवर धरत बाधितांचे मृत्यू लपवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सरकारने या मृत्यूच्या नोंद करताच राज्यातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. त्यातच आरोग्य खात्याने करोनाबाधिताच्या मृत्यूबाबत आता नवीन सूचना  काढली आहे. त्यानुसार बाधिताचा मृत्यू अपघात, आत्महत्या, खून, विषप्राशन इत्यादी बाबी सोडून कोणत्याही कारणाने झाल्यास तो करोनाच्या संवर्गातच नोंदवायचा आहे. या सूचना नागपूरसह इतरही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांत सोमवारी पोहचल्या आहेत.

नवीन सूचनेत ४८ तासांच्या आत माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकाराने पोलिसांच्या नोंदीसह इतर कारणाने दगावलेल्यांची माहिती मिळण्यास विलंब होत असल्यावरही करोना मृत्यूंची वेळीच नोंद होईल. यशोधरानगर परिसरात २८ जूनला अपघातानंतर मेयोत आणलेल्या तरुणाचा आधीच मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या चाचणीत या तरुणाला करोनाचे निदान झाले.  या व्यक्तीची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रोज तयार होणाऱ्या करोनाग्रस्ताच्या मृत्यूत नोंदवली गेली. परंतु आरोग्य खात्यात त्याच्या नोंदीबाबत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ही नोंद होणार कुठे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शवविच्छेदन झाले नाही

बाधित तरुणाचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शवविच्छेदन झाले नाही. त्याच्या अपघाताची नोंद रुग्णालयात असली तरी त्याच्या मृत्यूचे कारण मेंदूत रक्तस्रावासह इतर कोणते, हे कळणे शक्य नाही.  या व्यक्तीचे शवविच्छेदन झाले नसल्याच्या वृत्ताला वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

‘‘दगावलेल्या अवस्थेत मेयोत आणलेल्या तरुणाला करोना असल्याने निदान झाल्याने प्रथम त्याची नोंद करोनाच्या संवर्गात केली गेली. परंतु अद्याप मुंबई स्तरावर माहिती दिली नाही. या प्रकरणात मृत्यू अंकेक्षणानंतर प्रसंगी नियमानुसार सुधारणा केली जाईल.’’

– डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर.