करोना नियम पाळले जात नसल्याचा आरोप

नागपूर : करोनाचा कहर बघता एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून वारंवार नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु या नियमांना हरताळ फासत नागपूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या विविध कार्यालयात एसटी कर्मचाऱ्यांना फेऱ्या कमी असतानाही मोठ्या संख्येने बोलावले जात आहे. त्यामुळे  एसटी कामगार संघटना संतापली आहे. त्यांनी  आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सध्या जिल्ह्यातील एसटीची  वाहतूक अत्यावश्यक सेवेतील म्हणजेच नाममात्र प्रवाशांसाठी सुरू आहे. परंतु एसटी प्रशासन जाचक परिपत्रक आणि नियमांचा आधार घेऊन गरज नसतानाही जास्त संख्येने चालक आणि वाहकांसह यांत्रिकी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना  कामावर बोलावत असल्याचा आरोप आहे. एप्रिल या एकाच महिन्यात नागपूर विभागातील एसटीच्या १२५ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे.  उपचारादरम्यान तब्बल १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

ही आकडेवारी धक्कादायक असतांनाही वरिष्ठांकडून गरज नसताना मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना सेवेवर बोलावले जात असल्याने कुणाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने संक्रमित होत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी केला असून तातडीने  नियमाबाबत सुधारणा न केल्यास तिव्र आंदोलनाचाही इशारा त्यांनी दिला आहे.