नागपूर : शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेच्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन व इतरही वैद्यकीय सोयी सुविधांचा अभाव आहे. शिवाय  रुग्णवाहिकेसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे  रुग्णांची फरफट होत आहे.

रुग्णांची प्रकृती बिघडल्यानंतर  रुग्णालयात नेण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाशी किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधूनही तासन्तास रुग्णवाहिका मिळत नाही. शहरात दहा झोन आहेत, मात्र महापालिकेकडे केवळ नऊ रुग्णवाहिका आहे. त्यात सहा रुग्णवाहिका सध्या रस्त्यावर फिरण्यायोग्य असल्या तरी त्यापैकी एकाही रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय नाही. आज कोटय़वधी रुपये खर्च करून  करोना केअर केंद्र उभारण्यात आले मात्र त्यात खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना दाखल केले जात नाही. करोनाच्या काळात ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाच अशी बंधने शासकीय रुग्णालयात फारशी पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने खासगी रुग्णवाहिकांसाठी कुठलीही दर निश्चिती न केल्याने रुग्णवाहिकेचे चालक लूट करत आहेत. सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला रुग्णवाहिकेचा व्यवसाय नागपुरात  करोनाच्या काळात जोरदार फोफावला आहे. काही सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका आहेत मात्र त्यांचा उपयोग होत नाही. महापालिकेच्या रुग्णवाहिका  उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो. दरम्यान  महापालिकेच्या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था नसली तरी रुग्णांना रुग्णालयात नेण्यापुरतीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. सध्या दहा झोनपैकी नऊ  झोनमध्ये रुग्णवाहिका आहे आणि त्यांचा उपयोग लोकांकडून केला जात आहे. महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क केला तर रुग्णवाहिका उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.