एक हजार प्राणवायू सिलेंडरसाठी निविदा; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नागपूर : करोना महामारीची साथ नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी काही ठोस निर्णय घेण्यात आले. त्यानुसार हवेतून प्राणवायू निर्मितीचे जिल्ह्य़ात १६ युनिट सुरू करण्यात येणार असून त्याला  आज मान्यता देण्यात आली. दुसरीकडे गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी एक हजार प्राणवायू सिलेंडरसाठी निविदा काढण्यात आल्या. ९०० प्राणवायू कॉंन्सट्रेट्रर यंत्र खरेदीचे कार्यादेशही देण्यात आले.

बाधितांच्या संख्येत रोज हजारोने होणारी वाढ  आणि मृत्यूसंख्येने गाठलेले  शतक यामुळे उपचार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून खाटा, औषध, प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. अपुऱ्या सुविधा आणि हजारो रुग्ण असे विषम प्रमाण असल्याने जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांनाही मर्यादा आल्या आहेत. अशाही स्थितीत जलदगतीने निर्णय घेऊन शक्य होईल तेवढय़ा सुविधा वाढवण्यावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी भर दिला असून त्याच अनुषंगाने मंगळवारी त्यांनी काही निर्णय घेतले आहेत.

त्यात रुग्णालयांसोबतच गृहविलगीकरणातील रुग्णांकडून प्राणवायू  सिलेंडरची मागणी वाढली आहे. त्यामुळे १ हजार सिलेंडरच्या निविदा काढण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साधारण ९०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनसाठीचे कार्यारंभ आदेश मंगळवारी देण्यात आले. वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड (वेकोलि)या कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७०० खाटांसाठी दोन, इंदिरा गांधी रुग्णालय व महाविद्यालयात  ३५० खाटांसाठी एक तर एम्समध्ये ७५० खाटांसाठी दोन असे प्राणवायू निर्मितीचे पाच प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. करोना संसर्ग उपचार पद्धतीमध्ये बाधितांना मोठय़ा प्रमाणात द्रव व  प्राणवायूची गरज असून त्यांना सुरळीत  पुरवठा होण्यासाठी प्रशासनाने  अधिकाऱ्यांची नियुक्ती के ली आहे.

हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरू करा – गडकरी 

विदर्भात प्राणवायूची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्य़ात हवेतून प्राणवायूची निर्मिती करणार प्रकल्प सुरू करण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. गडकरी यांनी मंगळवारी सायंकाळी विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, नागपूर आणि अमरावतीचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली. प्राणवायूअभावी कोणाचा मृत्यू होऊ  नये यासाठी तातडीने निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यात हवेतून प्राणवायू निर्माण करणारे प्रकल्प सुरू करण्याचा आणि प्राणवायू कॉन्संट्रेटर व व्हेंटिलेटर जिल्हानिहाय वितरित करण्यावर चर्चा झाली. वध्र्यामध्ये पुढील  आठवडय़ात तयार होत असलेले रेमडेसिविर इंजेक्शन सर्व जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यावर सुद्धा बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला नितीन राऊत, एकनाथ शिंदे, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, शंभुराजे देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.