महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांची कृपा

नागपूर : सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या व अनेक वर्षांपासून रखडलेल्या महाराजबाग येथील डीपी रस्त्याच्या कामासंदर्भात प्रशासनाच्या वाढीव कामाच्या २ कोटी ४७ लाख ३२ हजार ६४९ रुपयांच्या प्रस्तावाला निविदा न काढता मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, स्थायी समितीनेही या प्रस्तावावर कुठलेही आक्षेप न घेता मंजूर केल्याने कंत्राटदारावर प्रशासकीय अधिकारी व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कृपा असल्याची चर्चा आहे.

महाराजबाग येथील ३०० मीटरच्या डीपी रस्त्याचा प्रकल्प चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. २०१४ मध्ये सर्वप्रथम हा रस्ता मंजूर झाला होता. याचे ३ कोटी ७६ लाख ९२ हजार ९१२ रुपयांचे कंत्राट मेसर्स अबरार अहमद या कंत्राटदाराला देण्यात आले होते. या रस्त्याच्या मार्गात सहा मीटर रुंद पूल तयार करून वाहतूक दोन्हीकडून बांधकाम हाती घेण्यात आले. व्हीएनआयटीकडून याचे डिझाईन मंजूर केल्यानंतर हे काम हाती घेण्यात आले. मात्र, वारंवार या कामात सोयीनुसार बदल करण्यात आला. त्यानंतरही या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

दरम्यान, या कामासाठी प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदाराला वाढीव कामाची रक्कम म्हणून २ कोटी ४७ लाख ३२ हजार ६४९ रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. पण तीन लाखांच्या वरील कुठल्याही कामांसाठी निविदा काढणे अनिवार्य आहे.

पाच टक्के पाणी दरवाढ मागे

करोना काळात शहरवासीयांना दिलासा देत दरवर्षी होणारी पाच टक्के पाणी करातील दरवाढ यंदा न करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे नागपूरकरांना यंदा दिलासा मिळाला आहे.