भारत-पाक सीमेवर तैनात होण्यापूर्वी देशाच्या विविध भागातून आलेल्या लष्कर जवानांना आणि अधिकाऱ्यांना मानसिकदृष्टय़ा तयार करण्याचे काम राजौरी जिल्ह्य़ातील प्रशिक्षण केंद्रात दिले जात असून यामुळे शांत परिसरातून आलेले जवान युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्ज होतात. सीबीएस, सरोल हे सैनिक प्रशिक्षण केंद्र आहे. यात सैनिकांना प्रशिक्षण दिले जाते. यामुळे जवान आणि अधिकारी मानसिकदृष्टय़ा तयार होतात, असे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्ट. कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले.
तीन वर्षे शांत परिसरात घालवण्यावर किंवा सुटीवर गेलेल्या जवानांना परिसराची माहिती आणि त्या भागात शत्रूशी लढण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी माहिती दिली जाते. या प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष सीमारेषेवर तैनात जवान असल्याचा आणि शत्रूंच्या हालचालींचा अंदाज येईल, अशा पद्धतीने दिवस-रात्री प्रशिक्षण दिले जाते. डोंगरळ भाग, नदी, नाले, झाडे-झुडपी, तसेच अतिदुर्गम भूप्रदेशात शूत्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
हे सर्व जवान आणि अधिकारी प्रशिक्षित असतात, परंतु शांत परिसरात राहिल्यानंतर प्रत्यक्ष सीमेरेषवर तैनात करतांना युद्धजन्य परिस्थितीत राहण्याची मानसिकता तयार होणे आवश्यक असते. त्यादृष्टीने या प्रशिक्षण केंद्रात जवानांपासून ते कर्नलपर्यंतच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण अत्यावश्यक करण्यात आले आहे. थेट सीमेवर किंवा अतिदुर्गम भागात जवान तैनात केल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राजौरी परिसरातील प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले असून जम्मू सेक्टरमध्ये असे चार प्रशिक्षण केंद्रे आहेत. यात काऊंटर इन्सर्जन्सी भूमिका, सीमेवरील कुंपणाची देखभाल दुरुस्ती, नियंत्रण रेषेवर जवानांची भूमिका आदींचे वर्षभरात १९ हजार जवानांना प्रशिक्षण दिले जाते. यात सीमापलिकडून होणारी घुसखोरी रोखणे आणि नियंत्रण रेषेवरील शूत्रंच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आणि प्रसंग चोख उत्तर देणे आदींचा समावेश आहे. प्रत्येक तुकडीत सुमारे ६०० जवानांना घुसखोरी रोखण्याचे, तर नियंत्रण रेषेवर तैनात होण्यासाठीचे प्रशिक्षण १२०० जवानांना दिले जाते. नेमबाजीत अचूकता येण्यासाठी वेगवेगळ्या १७ ‘फायरिंग रेंज’ आहेत. याशिवाय, शूत्रंचा डाव उधळण्यासाठी आवश्यक विविध उपकरणांचा वापर व विविध प्रकारचे ध्वनी, गंध ओळखण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. एवढेच नव्हे, तर बॉम्ब, आयईडी, भूरुंग हुडकून काढणे व निकामी करणे व रस्त्यावरून वाहनांचा ताफा जाण्यापूर्वी रस्ता सुरक्षित आहे किंवा नाही, याची चाचपणी घेण्याचे प्रशिक्षण येथे दिले जाते.
ज्या भागात जवानांना तैनात करण्यात येणार आहे त्या भागातील भौगोलिक स्थितीचा अभ्यास आणि तशीच परिस्थिती निर्माण करण्यात असल्याने जवान त्या परिस्थितीशी जळवून घेण्यास अनुकूल होतो. या प्रशिक्षणामुळे सीमेचे रक्षण करताना मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय, अतिदुर्गम भागात तैनात जवानांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबल्या आहेत.